लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या समर्थकांनी महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. लॉकडाऊनमुळे विदर्भवाद्यांनी आपापल्या घरांवर विदर्भाचा झेंडा फडकवून स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी लॉकडाऊनमुळे नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. यानुसार विदर्भवाद्यांनी आपापल्या घरीच काळी पट्टी बांधून विदर्भावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध केला. विदर्भवाद्यांनी सांगितले की, केवळ राजकीय उद्देशाने १९६० मध्ये विदर्भाला महाराष्ट्रात सामील करण्यात आले. तेव्हापासूनच विदभाचे शोषण सुरू आहे. यामुळे गेल्या ६० वर्षांत विदर्भातील सिंचन सुविधा वाढलेल्या नाही. बेरोजगारी वाढली. चाळीस हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, विदर्भाचा बॅकलॉग वाढत गेला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या स्थापनेनंतरच हा अन्याय दूर होऊ शकतो असा दावा करीत कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राम नेवले यांनी दिला.
विदर्भ कनेक्टने घडवून आणली ऑनलाईन चर्चा
लॉकडाऊनमुळे सर्व यंत्रणा बंद आहे, त्यामुळे नेहमीप्रमाणे आंदोलन न करता विदर्भ कनेक्टने यंदा झूम अॅपच्या माध्यमातून विदर्भावर चर्चा घडवून आणली. यात देशविदेशातील विदर्भवादी सहभागी झाले होते. अडीच तास ही चर्चा चालली. यात अनेकांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी ‘विदर्भाचे राज्य निर्माणाचा इतिहास आणि संविधान’ यावर प्रकाश टाकला. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी ‘विदर्भ राज्याची अर्थव्यवस्था’, स्वतंत्र विदर्भ राज्य कसे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे यावर राम नेवले यांनी ‘विदर्भ राज्यासाठीची आंदोलने, महा विदर्भ जनजागरणचे नितीन रोंघे यांनी ‘विदर्भाची आजची परिस्थिती’ आणि सिंचनाची आकडेवारी सादर केली. व्ही-कॅनचे सचिव दिनेश नायडू यांनी आभार मानले.