नागपूर : भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृहविभागाने गुरुवारी जारी केले. नागपुरातील तीन उपायुक्त, एक अधीक्षकांसह विदर्भातील दहा ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, अकोल्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.
राज्यात सत्ताबदलानंतर या जिल्ह्यांना नवीन अधीक्षक मिळतील व राज्यातील ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या दिवाळीअगोदर होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. अनेकांनी विविध पद्धतीने प्रयत्नदेखील सुरू केले होते. गृह विभागाच्या यादीनुसार नागपूर शहरातील तीन उपायुक्तांच्या बदल्या झाल्या असून, तिघांकडेही अधीक्षकपदाची जबाबदारी आली आहे. नागपूरचे पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांची वर्धा, वाहतूक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांची बुलडाणा, उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली येथील अधीक्षकपदी बदली झाली. नवी मुंबई येथील रा.रा.पोलीस बलाचे समादेशक संदीप घुगे हे अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक झाले आहेत. लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे गोंदिया, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रवींद्रसिंह परदेशी यांच्याकडे चंद्रपूर तर बृहन्मुंबईतील पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे गडचिरोलीच्या अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह हे यवतमाळचे नवीन अधीक्षक असतील. तर राज्यपालांचे परिसहायक सिंगुरी विशाल आनंद यांची नागपूर ग्रामीणच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे.
याशिवाय नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राकेश ओला यांची अहमदनगर तर लोहमार्ग अधीक्षक एम.राजकुमार यांची जळगावच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. नागपूर ग्रामीणचे अधीक्षक विजयकुमार मगर यांचीदेखील बदली झाली असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश लवकरच जारी करण्यात येतील.
‘आरपीटीएस’च्या प्राचार्यपदी पाटील
नागपूरच्या ‘आरपीटीएस’चे प्राचार्य श्रीकांत परोपकारी यांची ठाण्याच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी ठाण्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे ‘आरपीटीएस’च्या प्राचार्यपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूरची जबाबदारी कुणाकडे ?
नागपूर पोलीस दलातील तीन उपायुक्तांची विविध ठिकाणी बदली झाली आहे. काही आठवड्यांअगोदर लोहीत मतानी यांचीदेखील भंडारा येथे बदली झाली होती. अशा स्थितीत आता या अधिकाऱ्यांच्या जागेवर कोणत्या अधिकाऱ्यांना जबाबदारी मिळेल याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत.
उपायुक्तांच्या विविध ठिकाणी बदली करण्यात आली.
यात प्रामुख्याने राकेश ओला, सारंग आवाड, नुरुल हसन, बसवराज तेली यांचा समावेश आहे.