लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावातील सात महिन्यात विदर्भात रुग्णांची संख्या ९८ हजारावर गेली आहे. यात सोमवारी २,४३५ नव्या रुग्णांची भर पडली तर ९३ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ९८,८३५ झाली असून मृतांची संख्या २,६३० वर पोहचली आहे. नागपुरात ४४, यवतमाळमध्ये नऊ, भंडाऱ्यामध्ये आठ, चंद्रपूर व वर्ध्यामध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले.नागपूर जिल्ह्यात चाचण्या कमी झाल्या. त्यामुळे बाधितांची नोंदही कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. ४४ रुग्णांचे बळी गेल्याने मृतांची संख्या १,७०२ वर गेली आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारी ४०० वर रुग्णांची नोंद झाली असताना ३११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णांची संख्या ९,०८५ झाली असून सहा मृत्यूंनी मृतांची संख्या २०४ वर गेली आहे.
गोंदिया जिल्ह्यातही रुग्णसंख्येचा वेग वाढला आहे. २५९ रुग्ण पॉझिटिव्ह तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ३,४१७ तर मृतांची संख्या ५१ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रोजच्या रुग्णांची संख्या २०० वर जात आहे. रुग्णसंख्या ६,०५८ झाली असून सात रुग्णांच्या मृत्यूंनी बळींची संख्या ७८ वर पोहचली आहे.
अकोला जिल्ह्यात १११ रुग्णांची नोंद झाली तर पाच रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५,७३१ तर मृतांची संख्या १८६ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून चार रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या १,६६२ तर मृतांची संख्या सात झाली आहे. सर्वात कमी मृत्यू याच जिल्ह्यात झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ५,०३६ वर गेली आहे.
वाशीम जिल्ह्यात ७२ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या २,८७६ तर मृतांची संख्या ५५ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची संख्या ६५ झाली आहे. जिल्ह्यात ८२ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या २,९६० झाली आहे. वर्धा जिल्ह्यात सात मृत्यू व ५९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या २,६२९ झाली तर मृतांची संख्या ५४ वर पोहचली आहे.