लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात असलेला बांबू, भद्रावतीमधील चिनी मातीची कला, कच्चा माल आणि उद्योगासाठी असलेले पोषक वातावरण आणि पुरेसे मनुष्यबळ लक्षात घेता विदर्भामध्ये खेळणी निर्मिती उद्योगाला वाव आहे. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये खेळणी उद्योगाचा उल्लेख केला होता.घरोघरी लहान मुलांना खेळणी भुरळ घालत असली तरी हा खेळणी उद्योग मात्र अनेक कारणांनी दुर्लक्षित ठरला आहे.पुरेसे भांडवल, तंत्रज्ञान, बाजारपेठ, तांत्रिक मार्गदर्शन न मिळाल्याने आणि बाहेरून आलेल्या खेळण्यांनी बाजारपेठा व्यापल्याने स्थानिक निर्मित खेळणी काळाच्या ओघात मागे पडत गेली. पूर्वी बांबूपासून विविध प्रकारची खेळणी बाजारपेठेत येत असत. त्यामधून बांबू कारागिरांना मोठा रोजगार उपलब्ध होत असे. विशेष म्हणजे ही खेळणी पर्यावरणपूरकही असायची. भद्रावतीमध्ये चिनी मातीची खेळणी तयार करण्याचा एके काळी मोठा व्यवसाय होता. विनोबा भावे यांच्याकडून या व्यवसायाला प्रोत्साहनही मिळाले होते. आता या व्यवसायाला अवकळा आली आहे. पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खेळणी डिझायनर तज्ज्ञ सुहासिनी पॉल यांच्या मते, भारतात नावीन्यपूर्ण, सुरक्षित, जागतिक स्तरावरील कमी खर्चातून खेळणी तयार केली जाऊ शकतात. डिझाईन, तंत्रज्ञान आणि उत्पादन या तीन क्षेत्रांचा मेळ घालून भारताने ‘डिझाईन इन इंडिया'वर लक्ष केंद्रित केले तर लवकरच खेळण्यांच्या चिनी आयातीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. भारत बिग टॉय मार्केट आणि जगाला पुरवठादार म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. चीनमध्ये सर्वात कमी किमतीच्या कच्च्या मालापासून तर उत्तम मालापर्यंतच्या वापरातून उच्च प्रतीची आणि महागडी अशी सर्व प्रकारची खेळणी तयार केली जातात. योग्य प्रशिक्षणातून यावर गृहोद्योग चालतो. पुरवठादार ही खेळणी निर्यात करतात. बजेटच्या मुद्यांमुळे ती स्वस्त पडतात, त्यामुळे बाजारात या खेळण्यांना मागणी असते. यावर विदर्भाचा बांबू मात करू शकतो. बांबूपासून निर्मित इलेक्ट्रॉनिक खेळणी विकसित केली तर ती अधिक लोकप्रिय होतील. यात प्लास्टिक किंवा फायबरचा अधिक वापर नसल्याने ती पर्यावरणपुरकही असतील.ठरू शकतो सूर्योदययावर भर दिल्यास विदर्भातील खेळणी उद्योगासाठी हा सूर्योदय ठरू शकतोे. सरकारने या उद्योगास अधिक कार्यक्षम करण्यासाठी खेळणी डिझायनरच्या सहभागातून टॉय डिझाईन सेंटरची स्थापना करावी. चांगल्या व नावीन्यपूर्ण डिझाईन्स देणाऱ्या उद्योगांना अनुदान द्यावे. स्थानिकांना सुट्या भागांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षित करावे. खेळण्यांच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी आयएसआय मार्कची अंमलबजावणी केली जावी. यातून ‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा स्वीकार वाढेल.जागतिक बाजारपेठेचा मेळ घालून आणि त्यांचे आकर्षण लक्षात घेऊन पारंपरिक खेळण्यांमध्ये आपण नवीनता आणू शकतो. पर्यावरणाला अनुकूल आणि कमी खर्चाची खेळणी तयार करू शकतो, याचा प्रशिक्षित डिझायनर म्हणून मला विश्वास आहे.- सुहासिनी पॉल, टॉय डिझाईन तज्ज्ञ
खेळणी उद्योग निर्मितीमध्ये विदर्भाला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 8:02 PM
पंतप्रधानांनी खेळणी उद्योगाला वाव देण्याचा उल्लेख केल्याने अपेक्षा वाढल्या आहेत. या व्यवसायाची आखणी करताना विदर्भाचा विचार झाल्यास येथील बेरोजगारांनाही न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देदुर्लक्षित क्षेत्राच्या अपेक्षा वाढल्या बांबू, चिनी माती देऊ शकते आधार