लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात दरवर्षी मार्च महिन्यापासून तापणारा उन्हाळा यंदा दोन महिने विलंबाने अवतरला आहे. असे असले तरी मे महिन्याची सुरुवातच कडक उन्हाने झाली आहे. रविवारी अकोलामध्ये सर्वाधिक म्हणजे ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.विदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच उन्हाच्या झळा जाणवत होत्या. मात्र यंदा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातदेखील पाऊस पडला. एवढेच नाही तर एप्रिल महिन्यामध्येही विदर्भात पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम येथील तापमानावर झाला. त्यामुळे एरवी मार्चपासून बसणारे उन्हाचे चटके यंदा मे महिन्यापासून जाणवायला लागले आहेत.वेधशाळेने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी अकोला शहरामध्ये शनिवारपेक्षा ०.१ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. त्याखालोखाल नागपूर आणि वर्ध्यामध्ये ४४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. नागपुरात १ अंशाने तापमानात वाढ झाली आहे.विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसात अचानकपणे वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथील तापमानात ०.९ अंशाने वाढ होऊन तेथील तापमान ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. चंद्रपुरातही १.३ अंशाने वाढ होऊन रविवारचे तापमान ४३.८ नोंदविण्यात आले आहे.अमरावतीमधील तापमानात शनिवारपेक्षा घट होऊन ४३.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. गडचिरोलीमधील तापमानातही जवळपास २ अंशाची वाढ झाली आहे.मागील आठवड्यात दिवसात विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता. काही ठिकाणी वादळ येऊन व गारांचा पाऊसही पडला होता. त्यामुळे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा कमी तापमानाचा राहिला. मात्र मे महिन्याच्या प्रारंभापासूनच उन्हाने आपली दाहकता सुरू केली आहे.दाहकता वाढलीदोन दिवसापासून विदर्भात उन्हाची दाहकता वाढली आहे. कोरोनामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना भरचौकांमध्ये वाढलेल्या उन्हाचाही सामना करावा लागत आहे. नागरिक कामासाठी तुरळक प्रमाणात घराबाहेर पडत असले तरी दुपारी मात्र रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. जनावरेही झाडांचा आश्रय शोधत आहेत.असे आहे विदर्भातील तापमानअकोला - ४४.९अमरावती - ४३.८बुलडाणा - ४१.४ब्रह्मपुरी - ४४.१चंद्रपूर - ४३.८गडचिरोली - ४२गोंदिया - ४२.६नागपूर - ४४.२वर्धा - ४४.२