नागपूरः नागपूरसह अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः झोडपले. विशेषतः सावनेर, कामठी, पारशिवनी व रामटेक तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. रामटेकसह परिसरात गारपिटीमुळे संत्रा, मोसंबी, भाजीपाला यांच्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
सावनेर तालुक्यातील चनकापूर, सिल्लेवाडा, दहेगाव (रंगारी), वलनी, रोहणा आणि पिपळा (डाक बंगला), तसेच कन्हान नदीकाठची काही गावे, कामठी तालुक्यातील कोराडी, महादुला, नांदा, तसेच पारशिवनी तालुक्यातील दहेगाव(जोशी)सह परिसरातील गावांमधील संत्रा व मोसंबी, तसेच कापणीला आलेली तूर, कपाशी, गहू, हरभरा, टोमॅटो यासह अन्य भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रामटेकजवळील दाहोदा आणि घोटी या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे गारांचा मोठा थर साचला होता. काही ठिकाणी मोठी झाडेही कोसळली.
भंडारा जिल्ह्यात घरांचे नुकसान
मंगळवारी भंडारा शहरासह चार तालुक्यांत पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वादळी वाऱ्यामुळे दोन घरांसह काही पानठेल्यावरील टिनाचे पत्रे उडून गेले.
गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक विस्कळीत
साेमवारी व मंगळवारी गडचिराेली जिल्ह्याला पावसाने झाेडपून काढले. साेमवारी रात्री व मंगळवारीही दमदार पाऊस झाला. आजपर्यंत काेरडे पडलेले नदी-नाले अवकाळी पावसाच्या तडाख्याने ओसंडून वाहू लागले. मिरची, कापूस व इतर रब्बी पिकांचे माेठे नुकसान झाले. गाेविंदपूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा नाला ओसंडून वाहू लागल्याने चामाेर्शी-गडचिराेली मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळी काळी काळ ठप्प पडली हाेती.
गोंदिया जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका
गोंदिया जिल्ह्यात सकाळी १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. अवकाळी पावसामुळे २४ हजार हेक्टरमधील पिकांना फटका बसला असून, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पावसाची शक्यता कायम
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील वातावरण बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होताच. मुसळधार पावसामुळे वातावरणातील गारठाही वाढला. पुढील दोन दिवस जिल्ह्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.