लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका सर्व शक्तिनिशी लढविण्याचा निर्धार विदर्भ माझा पार्टीने केला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा पक्षाचा प्रमुख निवडणुकीचा मुद्दा राहील, अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.तिरपुडे म्हणाले, मध्य प्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी हा आजवरचा विदर्भातील नागपूरच्या प्रवासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास संयुक्त महाराष्ट्राचा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याचे निदर्शनास येते. एकीकडे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विविधांगी विकास होत असताना विदर्भाबाबत निरंतर वाढता व कधीही भरून न येणारा प्रचंड अनुशेष विविध क्षेत्रात निर्माण झाला असून स्वतंत्र राज्य बनल्याशिवाय विदर्भास कोणताही दुसरा पर्याय नाही, असे आमचे ठाम मत आहे.राज्य नवनिर्मितीसाठी नियोजित फजल अली समितीने १९५६ सालीच विदर्भ व तेलंगणा ही दोन राज्ये व्हावीत अशी शिफारस केली होती. तेलंगणा राज्य आज अस्तित्वात आले असून अतिशय अल्प कालावधीत राजकीय इच्छाशक्ती व सक्षम नेतृत्वाच्या बळावर त्या राज्याने अतुलनीय प्रगती साधली आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी तसेच दलित, आदिवासी, महिला व विद्यार्थीवर्ग यांचे सक्षमीकरण, कृषी, विकास, रोजगार, ग्राम विकास, स्थानिक उद्योग इत्यादींना प्रोत्साहन व सुशासन या प्रमुख उद्दिष्टांसह आगामी विधानसभा निवडणुकांना विदर्भ माझा पक्ष विदर्भात सामोरा जात असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेत मंगेश केदार आणि बाबा कोंबाडे उपस्थित होते.
विदर्भ माझा पार्टी विधानसभा निवडणुका लढणार : राजकुमार तिरपुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:05 PM
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका सर्व शक्तिनिशी लढविण्याचा निर्धार विदर्भ माझा पार्टीने केला आहे , अशी माहिती विदर्भ माझा पार्टीचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देस्वतंत्र विदर्भ प्रमुख मुद्दा