बुलडाणा : राज्यातील विविध पक्षांची भूमिका राजकीय स्वरूपाची आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर दबाव निर्माण करण्याची गरज असून, यासाठी विदर्भाचे आंदोलन रस्त्यावर दिसले पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे माजी महाधिवक्ता, विदर्भवादी विचारवंत अँड. श्रीहरी अणे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.बुलडाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित 'मीट द प्रेस' कार्यक्रमात अँड. अणे बोलत होते. कार्यक्रमाला जनमंचचे अँड. अनिल किल्लोर, अँड. दीपक पाटील, संदेश सिंगलकर, अँड. मुकेश सर्मथ, अँड. विजय साळवे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळे उपस्थित होते. यावेळी अँड. अणे म्हणाले की, स्वतंत्र विदर्भाबाबत विविध राजकीय पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. भाजपने विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले; मात्र त्या दृष्टीने ठोस पाऊले अद्याप उचलली नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षाकडून अपेक्षा नाही; मात्र स्वतंत्र विदर्भासाठी जनआंदोलनाचे स्वरूप आल्यास राष्ट्रीय स्तरावर एक पर्यायी विश्वसनीय दबाव निर्माण करण्यात येईल. विदर्भासाठी होणार्या विविध आंदोलनांचे एकत्रीकरण होणे आवश्यक असून, राजकीय-अराजकीय संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासंदर्भात अकोला येथे लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. स्वतंत्र विदर्भ ही जनमानसाची इच्छा आहे. या मुद्दय़ावर उभे असलेले उमेदवार निवडून येत नसले तरी जनमत घेतल्यास विदर्भाच्या बाजूने कौल मिळेल. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. ५१ टक्क्यांपेक्षा कमी जनमत असल्यास विदर्भाची चळवळ बंद करण्यात येईल; मात्र स्वतंत्र विदर्भासाठी ५१ टक्क्यांपेक्षा जास्त जनमत असून, नागपूरसह मोठय़ा शहरांत जनमंच संस्थेने घेतलेल्या मतदानात ते दिसून आले आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेकांनी बलिदान दिले; मात्र स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे. आता २९ हजार शेतकर्यांच्या बलिदानाचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वांंगीण विकासासाठी लहान राज्य आवश्यक आहे. मोठय़ा राज्यात कृषी, सिंचन, विकासाचे प्रश्न सुटणार नसतील, तर लहान राज्य निर्माण करून ते सोडविणे आवश्यक आहे, असेही अँड. अणे यांनी सांगितले.
विदर्भाचे आंदोलन रस्त्यावर दिसले पाहिजे!
By admin | Published: April 04, 2016 2:09 AM