नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाराष्ट्राची निर्मिती होऊन ६४ वर्षे झाली. मात्र, या कालावधीत सातत्याने विदर्भावर अन्यायच होत आहे. राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे विदर्भातील विकासाची वाट लागली आहे, त्याच्या निषेधार्थ येत्या २८ सप्टेंबरला विदर्भातील सर्व जिल्हा तसेच तालुकास्थळावर 'नागपूर कराराची' होळी करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आ. ॲड वामनराव चटप यांनी दिली.
विदर्भात बारमाही नद्या आहेत. विपुल खनिज आणि वनसंपदा आहे. कुशल मनुष्यबळ आहे. मात्र, एवढे सर्व असूनही विदर्भाचा विकास झालेला नाही. विदर्भातील सिंचनाचा प्रश्न, दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी एकीकडे चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे येथील कोळसा, वीज दुसऱ्या प्रदेशांत पाठविली जाते. हवालदिल शेतकरी, त्याचे कुटुंबीय आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी २८ सप्टेंबरला नागपूर कराराची होळी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, रंजनाताई मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासूरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, नरेश निमजे, प्रशांत नखाते, गुलाबराव धांडे, अशोक धापोडकर, गंगाधर मुंडकर आदी यावेळी उपस्थित होते.