सुनील चरपेलाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वाईन’ म्हटले की दारू (लिकर) डाेळ्यासमाेर येते. हा मद्याचा प्रकार असला तरी यात अल्काेहाेलचे प्रमाण फारच कमी असते. ‘वायनरी’ उद्याेगामुळे द्राक्षाला चांगले दर मिळू लागले. संत्र्यामध्ये इतर फळांच्या तुलनेत ‘ज्यूस’चे प्रमाण अधिक असल्याने त्यापासून चांगल्या प्रतीची ‘वाईन’ तयार हाेऊ शकते. संत्र्याच्या ‘वाईन’ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात भरीव मागणी निर्माण करता येऊ शकते. त्याअनुषंगाने विदर्भात संत्रा ‘वायनरी’ उद्याेगाला माेठा वाव आहे, अशी माहिती वाईन व संत्रा उत्पादक क्षेत्रातील जाणकार व्यक्तींनी दिली. दुसरीकडे या उद्याेगाकडे शासनाने दुर्लक्ष केले असून, उद्याेजकांनी पाठ फिरवली आहे, असा आराेप संत्रा उत्पादकांनी केला आहे.
वाईनमध्ये १०० टक्के फळांचा ज्यूस असताे. संत्र्याच्या ज्यूसवर ‘डी बिटरिंग प्लांट’मध्ये प्रक्रिया केल्यास त्याचा कडवटपणा नाहीसा हाेऊन संत्र्याची मूळ चव कायम राहते. त्यात ‘इस्ट’ मिसळून वाईनची निर्मिती केली जाते. त्यात नैसर्गिक प्रक्रिया हाेऊन आपाेआप ५ ते ६ टक्के अल्काेहाेल तयार हाेते. त्यात अल्काेहाेल अथवा इतर पदार्थ मिसळवले जात नाहीत. ही वाईन म्हणजे संत्र्याचा ‘फरमेंडेट ज्यूस’ हाेय. स्पेनसह इतर युराेपियन राष्ट्रांमध्ये प्रत्येक जण संत्र्याची वाईन जेवणापूर्वी पितात. वाईन जेवढी जुनी तेवढी त्याला अधिक किंमत मिळते. संत्र्याच्या ज्यूसपासून ‘लिक्युअर’ नामक पेय तयार केले जात असून, ते युराेपियन राष्ट्रांमध्ये जेवणानंतर प्यायले जाते, अशी माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांच्यासह वाईन उत्पादकांनी दिली आहे.‘वायनरी’वर कार्यशाळासंत्रा वायनरी उद्याेगाला चालना मिळावी म्हणून ‘वेद’ (विदर्भ इकाॅनाॅमिक डेव्हलपमेंट काैन्सिल) व महाऑरेंजने नऊ वर्षांपूर्वी नागपूर शहरात कार्यशाळा आयाेजित केली हाेती. या कार्यशाळेत देशभरातील १० नामवंत वाईन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी संत्र्यापासून तयार केलेली वाईन सादर केली हाेती. या उद्याेगाला विदर्भात माेठी अनुकूलता असल्याने शेतकऱ्यांसह उद्याेजकांनी यात उतरावे, असे त्या कार्यशाळेत सर्वांनीच सांगितले हाेते. मात्र, त्यावर कुणीही अंमलबजावणी केली नाही. शिवाय, शासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यासाठी संत्रा उत्पादकांचा प्रभावी दबावगट आवश्यक असल्याचे श्रीधर ठाकरे, मनाेज जवंजाळ, रमेश जिचकार यांच्यासह इतर संत्रा उत्पादकांनी सांगितले.
संत्र्यापासून तयार हाेणारी उत्पादनेसंत्र्यापासून ज्यूस, ज्यूस काॅन्सेंट्रेट, पल्प, मार्मालेड, स्काॅश, वाईन, लिक्युअर, पशुखाद्य तयार हाेतात. संत्र्याच्या सालीचा वापर काॅस्मेटिक उत्पादने व शाम्पू तयार करण्यासाठी केला जाताे. संत्र्याच्या सालीपासून ‘ऑईल’ तयार केले जात असून, ते ऑईल व लिक्युअर परदेशात महागड्या किमतीत विकले जाते. संत्र्यापासून वाईन तयार करण्याच्या हार्वेस्टिंग, क्रशिंग, प्रेसिंग तसेच फरमेंडिंग व क्लेअरिफिकेशन आणि अगेइंग व बाॅटलिंग या तीन टप्प्यात केली जात असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
संत्र्यापासून वाईन तयार करण्यावर संशाेधन सुरू आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थी त्यावर काम करीत आहे. आगामी एक दाेन वर्षात त्याचे ‘आऊटपुट’ मिळेल. द्राक्षापासून तयार केलेली वाईन लाेकप्रिय झाली आहे. संत्र्यापासून चांगली वाईन तयार हाेऊ शकते. त्यामुळे भविष्यात संत्र्याला चांगले दिवस येतील.- प्रा. डाॅ. विनाेद राऊत, प्रादेशिक फळ संशाेधन केंद्र, काटाेल.