लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलन’ म्हणून लढविणार असून, त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना, शेतकरी संघटना, बेरोजगार संघटनांशी समन्वय साधणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. सोबतच अनेक आश्वासनांची खैरात वाटली होती. परंतु गेल्या साडेचार वर्षात एकही आश्वासन खरे ठरले नसल्याचा आरोप समितीने केला आहे. पक्ष २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीत लागला आहे. यावळी विदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा व बेरोजगारांचा मुद्दा उचलून भाजपाला घेरणार आहे. २०१९ च्या पूर्वी विदर्भ राज्याची निर्मिती करावी, यासाठी भाजपावर दबाव वाढविणार आहे. त्यासाठी ‘विदर्भ द्या अन्यथा विदर्भ सोडा’ यासाठी निवडणुकीला आंदोलन म्हणून लढविणार आहे.त्याचबरोबर समिती स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला जोर देण्यासाठी ‘विदर्भ राज्य निर्माण यात्रा’ काढणार आहे. ही विदर्भातील ११ ही जिल्ह्यातून फिरणार आहे. विदर्भ राज्य निर्मितीचा संदेश घराघरापर्यंत पोहचविणार आहे. विदर्भवादी पक्ष, संघटना, कार्यकर्ते, शेतकरी संघटना यांचा समन्वय करण्यासाठी निवडणूक समिती २५ नोव्हेंबरपासून जिल्हावार दौरे करणार असल्याचे नेवले म्हणाले. पत्रपरिषदेला अॅड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबिरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, अरविंद देशमुख, राजकुमार नागुलवार, विजया धोटे, रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर, विष्णू आष्टीकर, जयंत चितळे उपस्थित होते.