नागपूर : मान्सूनच्या आगमनानंतर दमदार पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या वैदर्भीयांसाठी जून महिना निराश करणारा ठरला. दाेन-तीन दिवस वगळता जाेराचा पाऊस झालाच नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांना फटका बसला असून, जून महिन्यात विदर्भात तब्बल ३९ टक्के कमी पावसाची नाेंद झाली आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशीही बॅकलाॅग पूर्ण हाेऊ शकला नाही.
गुरुवारी जूनच्या शेवटच्या दिवशी गडचिराेलीत सर्वाधिक ४१.४ मिमी पावसाची नाेंद झाली. मात्र, हा पाऊस जिल्ह्यातील पावसाची तूट भरू शकला नाही. गडचिराेलीत जून महिन्यात ४७ टक्के कमी पावसाची नाेंद झाली आहे. सर्वाधिक ५१ टक्के तुटवडा यवतमाळ जिल्ह्याचा आहे. याशिवाय सरासरीपेक्षा वर्धा ४७ टक्के, भंडारा ४१ टक्के, अमरावती ३९ टक्के, चंद्रपूर ३६ टक्के, नागपूर ३१ तर गाेंदियात ३० टक्के कमी पाऊस पडला. विदर्भात जून महिन्यात सरासरी १७५.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात येते; पण या वर्षी केवळ १०६.८ मिमी पाऊस झाला असून, बॅकलाॅग ३९ टक्क्यांवर गेला आहे. नेहमी मराठवाड्यात कमी पाऊस हाेताे; पण, यावेळी विदर्भापेक्षा अधिक १४४.४ मिमी पाऊस मराठवाड्यात नाेंदविण्यात आला. पुढच्या जुलै महिन्यात तरी विदर्भाचा पावसाचा बॅकलाॅग भरून निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत ब्रह्मपुरी ११ मिमी, चंद्रपूर ८ मिमी पाऊस झाला. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत अमरावती १५ मिमी, वर्धा १४ मिमी, बुलडाणा ६ मिमी व नागपूरला ४ मिमी पावसाची नाेंद झाली. इतका थाेडा पाऊस तूट भरून काढण्यास पुरेसा नव्हता.
नागपूरकरांना पुन्हा पावसाची हुलकावणी
नागपूरसह विदर्भात २९ व ३० जूनदरम्यान दमदार पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला हाेता; पण, लहरी हवामानाने ताे फाेल ठरविला. सकाळपासून काहीसे ऊन तापल्यानंतर दुपारी काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली व गडगडाट सुरू झाला. पाऊस जाेरात बरसणार अशी अपेक्षा हाेती; पण थाेडा वेळ काहीच भागात हलक्या रिमझिमशिवाय काही झाले नाही. रात्रीही ढग दाटले हाेते. जिल्ह्यात तालुकास्तरावर मात्र हलक्या सरींनी दिलासा मिळाला. रामटेक व कामठीत सर्वाधिक १६.७ मिमी पाऊस झाला. त्यानंतर पारशिवनी व कळमेश्वर १५.२ मिमी, सावनेर १५.४ मिमी, हिंगणा व नरखेड १०.२ मिमी, उमरेड व कुही १०.४ मिमी, माैदा १४.३ मिमी तर भिवापूरला ८.९ मिमी पावसाची नाेंद झाली.