नागपूर : कम्युनिस्ट पक्ष संपला असे समजू नका. तो पुन्हा नव्याने प्रस्थापित होऊ शकतो. कारण शोषण आहे तोपर्यंत प्रतिकारासाठी मार्क्सवाद राहणारच आहे, तो संपणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि.स.जोग यांनी प्रकट मुलाखतीत केले.
विदर्भ साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी साहित्यिक डॉ. वि. स.जोग यांची प्रकट मुलाखत डॉ.अजय कुलकर्णी व स्नेहल शिंदे यांनी घेतली. याप्रसंगी डॉ. जोग यांच्या प्रसिद्ध मकरंद मुमताज या साहित्यकृतीवर विविध प्रश्न विचारून डॉ. जोग यांना बोलते केले. राजकारण ते समाजकारण यांचा साहित्य क्षेत्रातील प्रभावावरही प्रश्न विचारला. साहित्यिक राजकारणापासून दूर राहू शकत नाही. आपण स्वतः कम्युनिस्ट विचारसरणी मानतो, असे डॉ. जोग यांनी स्पष्ट केले.
नितीन गडकरी व भाई बर्धन ही दोन्ही मंडळी वेगळ्या विचारसरणीची आहेत. असे असले तरी दोघांची विचारसरणी मला पटणारी असल्यामुळे आपण केलेली मांडणी विसंगत नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यावर गडकरी भाई वर्धन यांची भेट घेण्यासाठी गेले होते असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
आत्मकथेतूनच आत्मविकासाचा मार्ग जातो. मात्र साहित्यिकांकडून महापुरुषाचे वस्तुनिष्ठ मापन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दलित साहित्यात पूर्वी आक्रमकता व आक्रोश होता. आता मात्र तो दिसत नसल्याचे मत त्यांनी मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर , स्वातंत्र्यवीर सावरकर व मार्क्स यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.
कोणत्याही संघटनेत नव्या व जुन्या लोकांची सरमिसळ असली पाहिजे. नव्यांनी जुन्यांना मनोहर जोशी करू नये, अशी टिप्पणी त्यांनी केली. आपल्याला मिळालेला सोव्हिएत युनियनचा पुरस्कार हा सर्वात मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणाचे अध:पतन झाले असल्याची खंतही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दरम्यान व्यक्त केली.