लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.पु. य. देशपांडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार यंदा विद्याधर बनसोड (चंद्रपूर) यांना ‘मुक्काम पोस्ट तेढा’ कादंबरीसाठी घोषित झाला असून दिवाकर मोहनी यांना ‘शुद्ध लेखनाचे तत्त्वज्ञान’ या ग्रंथासाठी डॉ. वा.वि. मिराशी स्मृतिपुरस्कार घोषित झाला आहे. यासोबतच विराग श्रीकृष्ण पाचपोर यांच्या ‘देवरस पर्व’, संजय आर्वीकर यांना ‘विश्वांगण’ या ग्रंथासाठी, मीनल येवले यांच्या ’मी मातीचे फुल’ या काव्यसंग्रहासाठी, मदन देशपांडे (अमरावती) यांना ‘हृदयस्पर्शी या ग्रंथासाठी, ‘वैदर्भीय संशोधक’ या ग्रंथासाठी डॉ. राजेंद्र डोळके, ‘राष्ट्रसंतांची विचारधारा’ या ग्रंथासाठी डॉ. बाळ पदवाड यांना तर अबोली व्यास यांना संस्कृत महाकाव्य सृष्टीला महाराष्ट्राचे योगदान या ग्रंथासाठी पुरस्कार घोषित झाला आहे. कहाण्या या नाटकासाठी अरविंद विश्वनाथ (अकोला), पीळ या काव्यसंग्रहासाठी सुनील यावलीकर (अमरावती) आणि माझ्या हयातीचा दाखला या काव्यसंग्रहासाठी विशाल इंगोले (लोणार) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.याशिवाय पत्रकार मंजुषा जोशी, रवींद्र इंगळे चावरेकर (बुलडाणा), डॉ. सतीश पावडे (वर्धा) यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच विजय प्रकाशन, माधवी कुंटे (मुंबई) आणि विदर्भ साहित्य संघाच्या भंडारा शाखेस यंदाचा विशेष शाखेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाचा यंदाचा ९७ वा वर्धापनदिन समारंभ १९ जानेवारी रोजी होईल. त्यावेळी हे पुरस्कार प्रदान केले जातील.
विदर्भ साहित्य संघांचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:26 PM