नागपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ३० ते ५५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार असल्याने देशाच्या उत्पादकतेवरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने घेतली आहे.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून १८ मेला विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन पाठविले जाणार आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणारे डी.ए.पी.चे दर १,२०० रुपये प्रती बॅगवरून १,९०० रुपये करून ५५ टक्के दरवाढ केली आहे.
सुपर फॉस्फेट ४०० रुपयांवरून ५०० रुपये, १०:२६:२६ हे खत १,१७५ रुपयांवरून १,७७५, १२:३२:१६ खत १,१९० वरून १,८००, २०:२०:० ९७५ वरून १,४०० रुपये, २४:२४:० खत १,३५० वरून १,९०० तर २०:२०:१३ हे खत १,०५० वरून १,६०० रुपयांवर गेले आहे. शेतमालाच्या किमती मर्यादित ठेऊन खतांच्या किमती वाढविणे हे शेतकऱ्यांना संकटात लोटण्यासारखे असल्याचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी म्हटले आहे.