नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने यंदाचा महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे. या काळात कोरोना संक्रमण लक्षात घेता डोक्यावर किंवा दंडावर काळी पट्टी बांधून किंवा घरावर काळा झेंडा लावून राज्य सरकारचा निषेध करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी विदर्भाच्या घोषणा देऊन घरावर विदर्भाचा झेंडा फडकवावा, तसेच घरूनच आंदोलन करून सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील आठ वर्षांपासून १ मे हा दिवस काळा दिवस पाळून विदर्भवादी नेते आंदोलन करीत असतात. मागील वर्षीही कोरोनामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने हे आंदोलन घरूनच केले होते. नागपूर करार करून १ मे १९६० रोजी विदर्भाला महाराष्ट्र राज्यात सामील करून घेतले. तेव्हापासून विदर्भाचे अस्तित्व संपले. त्या दिवसापासूनच विदर्भातील जनतेवर सुरू झालेला अन्याय अद्यापही थांबलेला नाही. सिंचन, नोकऱ्या प्रकल्प यात तफावत असून करारातील ११ कलमांपैकी एकही कलम पूर्ण केले नसल्याबद्दल विदर्भवाद्यांचा रोष आहे. वेगळे विदर्भ राज्य स्थापन करून न्याय द्यावा, अशी मागील अनेक वर्षापासूनची मागणी आहे.
...
सरकारने विदर्भाला वाऱ्यावर सोडले
राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकार मुंबई-पुणे-नाशिक-ठाणे याच परिसराकडे कोरोनावर लक्ष केंद्रित केले असून विदर्भाच्या जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. विदर्भात कोरोनाची दुसरी लाट भयानक येणार हे माहीत असूनही कोणतेही नियोजन केले नाही. महाआघाडी सरकार व विरोधी पक्षांचे नेते फक्त राजकारण करीत असल्याचा आरोप मुख्य संयोजक राम नेवले यांनी केला आहे.
...