नागपूर : नागपूर कराराने विदर्भाला २८ सप्टेंबर १९५३ ला महाराष्ट्रात सामील करून घेतले. मात्र, या कराराच्या ११ ही कलमांचे पालन करण्यात आले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भावर अन्यायाची मालिका उभारली. याचा निषेध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर शहरात विविध ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.
व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तसेच जगनाडे चौक व शहीद चौक विदर्भ चंडिका मंदिरासमोरही नागपूर कराराची होळी करण्यात आली. होळी करताना विदर्भवाद्यांनी ‘जळाला रे जळाला, फसवा करार जळाला’, ‘लेके रहेंगे लेके रहेंगे, विदर्भ राज्य लेकर रहेंगे’ अशा घोषणा दिल्या. आंदोलनात अरुण केदार, प्रकाश पोहरे, संजय मुळे, रवींद्र भामोडे, मुकेश मासुरकर, खा निमजे, सुधा पावडे, प्रभाकर कोंडबत्तुनवार, कोअर कमिटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर, ओमप्रकाश शाहू, गुणवंत सोमकुवर यांच्यासह विदर्भवाद्यांनी भाग घेतला.
विदर्भातील बेरोजगारीचे काय ?
- नागपूर कराराच्या अभिवचनाप्रमाणे २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांना देण्याचे कबूल केले होते. मात्र, याउलट चार लाखांहून अधिक नोकऱ्या पळविल्या. त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. सोबतच विदर्भात कारखाने उभारण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात युवकांचे पलायन झाले, असे सांगत याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.