नागपूर : राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विरोध असून, आम्हाला वेगळा विदर्भच हवा आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत केले.
ॲड. वामनराव चटप म्हणाले, नागपूर कराराप्रमाणे विदर्भाच्या हक्काचे सिंचनाचे ६० हजार कोटी रुपये कमी मिळाले असून, सिंचनाचा अनुशेष कायम आहे. निधीअभावी विदर्भातील १३१ धरणे अपूर्ण असल्याने १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. विदर्भात २.५७ लाख रिक्त पदे असून, १४ लाख बेरोजगार आहेत. विदर्भाचा सिंचनाचा व इतर क्षेत्रातील एकूण ७५ हजार कोटींचा अनुशेष भरून निघणे शक्य नसल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यासाठी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येईल. तसेच ३ ऑटोबरला जिल्ह्याजिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकारी, तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करून वेगळ्या विदर्भाची मागणी रेटून धरण्यात येणार आहे. याशिवाय प्रशांत किशोर, डॉ. आशिष देशमुख यांचा विदर्भ राज्य आंदोलन समितीशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, रेखा निमजे, सुधा पावडे, नरेश निमजे, गुलाबराव धांडे आदी उपस्थित होते.