नागपूर : पुढील २४ तासांत नागपूरसह विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अकाेला, अमरावती, भंडारा व इतर काही भागात साेसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीटही हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हे वातावरण पुढचे दाेन दिवस ४ एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. या काळात मेघगर्जनेसह हलका पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे.
पश्चिम बंगाल हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम, तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार हाेणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
या प्रभावाने दरम्यान दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे दाेन दिवसांपूर्वी ४० अंशांपर्यंत वाढलेला पारा झपाट्याने खाली घसरत ३४.४ अंशावर खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्यापासून माेठा दिलासा मिळाला आहे. मंगळवार व बुधवारीही आकाश ढगांनी व्यापले हाेते. त्यामुळे सूर्य किरणांची तीव्रता अतिशय कमी झाल्याची स्थिती आहे.
बुधवारीही सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी हाेती पण दुपारपर्यंत शांत असलेले वातावरण सायंकाळच्या सुमारास अशांत झाले. साेसायट्याचा वारा व ढगांचा गडगडाट हाेत हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वातावरणही तयार झाले आहे. रात्री पुन्हा वादळासह वादळाची शक्यता निर्माण झाली आहे.
रात्री वादळ आणि पाऊसही
मंगळवारी विजांचा कडकडाट, मेघगर्जना व साेसाट्यांच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरीही बरसल्या. नागपूरला सकाळपर्यंत २.२ मिमी पावसाची नाेंद झाली. वर्धा जिल्ह्यात मात्र पावसाने जाेरदार हजेरी लावली. येथे तब्बल २७ मि.मी. पाऊस सकाळपर्यंत नाेंदविला गेला. अकाेला, अमरावती, भंडारा या जिल्ह्यातही वादळासह पावसाने हजेरी लावली. वादळ आणि पाऊस पुन्हा दाेन दिवस मुक्कामी असल्याचा अंदाज आहे.
वादळाने नागपुरात बत्ती गुलदरम्यान साेसाट्याचा वारा, वादळामुळे मंगळवारी रात्री नागपुरात विज पुरवठा खंडित झाला हाेता. शहरातील विविध भागातील बत्ती गुल झाली हाेती. दक्षिण नागपूरचा बराचसा भाग रात्री अंधारात हाेता. त्यामुळे उष्णतेसह नागरिकांना डासांचाही त्रास सहन करावा लागला.