नागपूर : विदर्भातील जनतेशी कोणतीही चर्चा न करता नागपूर करार करून विदर्भाला महाराष्ट्रात सामिल करून घेण्यात आले. या करारानेच विदर्भाचा घात केला, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. वेगळे विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात २८ सप्टेंबरला विदर्भभर नागपूर कराराची होळ करून राज्य सरकारचा निषेध नोंदविला जाणार आहे.
या आंदोलनानुसार, विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयात आणि तालुक्यांच्या अशा १०० ठिकाणी विदर्भवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपूर कराराच्या प्रति जाळृून आंदोलन करणार आहेत. २८ सप्टेंबर १९५३ रोजी हा करार करण्यात आल्याने या दिवसाची आठवण म्हणून आंदोलनासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. विदर्भाच्या हक्काच्या निधीची पळवापळवी सुरू असल्याने विदर्भावर अन्याय सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेते व विदर्भातील जनप्रतिनिधी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप विदर्भ राज्य संघर्ष समितीने केला आहे.