लाेकमत न्यूज नेटवर्क
धापेवाडा : धापेवाडा (ता. कळमेश्वर) येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी असयची. मंदिर परिसरात माेठी यात्राही भरायची. काेराेना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रा भरवू नका, असे आदेश दिल्याने आषाढी एकादशीला दुमदुमणारी विदर्भाची पंढरी सलग दुसऱ्या वर्षी शांत हाेती. मात्र, पूजा, आरती, अभिषेक व अन्य धार्मिक साेपस्कार पूर्ण करण्यात आले.
श्री कोलबास्वामी देवस्थानाचे मठाधीपती श्रीहरी वेळेकर व जयेंद्र वेळेकर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २०) पहाटे ४ वाजता विठूरायाची पूजा, आरती व अभिषेक करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुख्मिणी देवस्थानाचे सचिव आदित्य प्रतापसिंह पवार, सरस्वती वेळेकर, मंगला वेेळेकर, मिलिंद वेळेकर, विनोद मेश्राम, जय वेळेकर, परिणिता वेळेकर उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिराच्या गाभाऱ्याची आकर्षक सजावट करण्यात आली हाेती. शिवाय, भाविकांची गर्दी हाेऊ नये तसेच ती गर्दी काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडू नये म्हणून मंदिर परिसरात पाेलीस बंदाेबस्त तैनात केला हाेता. पूजा, आरती आटाेपल्यानंतर मंदिर व परिसर पूर्वीप्रमाणेच शांत झाला. ही शांतता दिवसभर कायम हाेती. अधूनमधून भाविक यायचे. सावनेर व कळमेश्वर पाेलीस बंदाेबस्तामुळे दुरून नमस्कार करून परत जायचे.
...
पाच जणांच्या उपस्थितीत कीर्तन
धापेवाड्याच्या आषाढी एकादशी यात्रेला २८३ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी कानावर पडणारे भजनाचे सूर, टाळ, मृदंग, चपळ्यांचा निनाद, नजरेस भरणाऱ्या भगव्या पताका यावर्षी अनुभवायला मिळाल्या नाहीत. परंपरेनुसार पांडुरंग बारापात्रे यांनी दुपारी २ वाजता पाच जणांच्या उपस्थितीत कीर्तनाला सुरुवात केली हाेती.
...
पंढरपूरला पर्याय
ज्यांना आषाढीची पंढरपूर वारी करणे शक्य हाेत नाही, ते धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात येऊन दर्शन घेतात. त्यामुळे हे देवस्थान पंढरपूरला पर्याय मानले जाते. याच कारणामुळे येथे मध्य प्रदेश व गुजरातमधून दरवर्षी भाविक यायचे. एकादशी व प्रतिप्रदेला यात्रा भरायची. संत कोलबास्वामी मठ, वारामाय मठ, रघुसंत महाराज व मकरंदपुरी महाराज मठातील दिंड्या सायंकाळी नगर भ्रमण करायच्या. विठुरायांचा जयघाेष व्हायचा.