नागपूर : विधानसभेत विदर्भाच्या चर्चेचा प्रस्ताव असताना सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावावर चर्चा न करता तो बासनात गुंडाळून विदर्भाची घोर निराशा केली असा सनसनाटी आरोप, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
याच कारणावरून विरोधकांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभात्याग करीत आंदोलन केले. वर्षा गायकवाड यांनी विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली मात्र त्यांना गप्प बसवून कामकाज रेटण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या सर्व मुद्यांवर २९३ अन्वये चर्चेसाठी मांडला होता. परंतू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तो टाळून अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला घेतला. सत्ताधाऱ्यांचा हा डाव विरोधकांची मुस्कटदाबी करणारा आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. कारण सत्ताधाऱ्यांना लवकरात लवकर कामकाज आणि अधिवेशन गुंडाळून नवी दिल्लीचे विमान गाठायचे होते. संयुक्त महाराष्ट्राचा करारात विदर्भात अधिवेशन अधिवेशन घेऊन विदर्भातील मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. सत्ताधारी स्वतःच प्रस्वाव मांडतात आणि ऑर्डर ही विधानसभा चालविण्याची पद्धत नव्हे.
ऑफ डे मध्ये प्रस्ताव असतानाही तो सभागृहात चर्चेला घेतला जात नाही. हा प्रकार निंदनिय असून, ही विधानसभा चालविण्याची पद्धत नाही, जितेंद्र आव्हाड म्हणाले. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाही, ही एकप्रकारे थट्टा सुरू असल्याचेही आव्हाड म्हणाले.
सत्ताधाऱ्यांचा चर्चेतून पळ- अनिल देशमुखसंयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचा समावेश करताना नागपूर करारानुसार अधिवेशन विदर्भात घेण्याचे ठरले होते. त्यासाठी हिवाळी अधिवेशन दिड महिने चालायला हवे. थातूर मातूर पॅकेज देऊन विदर्भावर अन्याय करण्याची एकही संधी सरकारने सोडलेली नाही. विदर्भातील सिंचनाचे, शेतकऱ्याचे, विजेचे प्रश्न आ वासून उभे आहेत.त्यात विदर्भात येऊ घातलेले मोठ मोठे उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. अशा मुद्यांवरून विरोधकांनी विदर्भातल्या समस्यांवर चर्चेची मागणी केली होती. मात्र या चर्चेतून सत्ताधारी पळ काढत आहेत, असे आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.