लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर विदर्भ कनेक्टनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रवादीही महाराष्ट्राचा झेंडा घेउन उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. विशेषत: शिवसेना व मनसेतर्फे विदर्भवाद्यांच्या भूमिकेला विरोध केला जातो. यावर्षी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा झेंडा आमनेसामने उभा ठाकण्याची शक्यता आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्रदिनाचा निषेध नोंदवित दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. नुकतेच समितीच्या कोर कमिटीच्या बैठकीत याबाबत घोषणा केली होती. बैठकीदरम्यान डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, प्रबीरकुमार चक्रवर्ती, प्रा. पुुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, मुकेश मासूरकर, विजया धोटे, अरुण केदार उपस्थित होते. विदर्भाचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून संविधान चौकात निषेध आंदोलन करणार आहेत. सत्तापक्ष भाजपाने स्वतंत्र्य विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नसून विदर्भातील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. पाच महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार असून विदर्भाच्या झेंड्यावर सर्व जागा लढविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. विदर्भाला विरोध करणाऱ्या पक्षांना विदर्भातून हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले.दुसरीकडे विविध विदर्भवादी संघटनाही निषेध आंदोलन करणार आहे. विदर्भ कनेक्ट, विदर्भ राज्य आघाडी आणि विदर्भ समर्थक संघटनांच्यावतीने काळा दिवस पाळण्यात येत असून विदर्भ चंडिका मंदिरात विदर्भाचा झेंडा फडकावण्यात येणार आहे. सकाळी ७.३० वाजता संविधान चौकातून बाईक, कार रॅली काढण्यात येईल. रॅलीला विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करतील. रॅली विदर्भ चंडिका माता मंदिर, शहीद चौक येथे पोहोचल्यानंतर महाआरती करण्यात येईल. सकाळी ९ वाजता श्रीहरी अणे यांच्या हस्ते विदर्भ आंदोलनाचा ध्वज फडकविण्यात येईल.दरम्यान दरवर्षी विदर्भवाद्यांना आव्हान देत शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र दिवस साजरा केला जातो. यावर्षी दोन्ही पक्षातर्फे भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचा झेंडा फडकविला जाण्याची शक्यता आहे.
विदर्भवादी-महाराष्ट्रवादी आज आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:58 AM
१ मे रोजी संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी तयारी केली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भवाद्यांनी निषेधाची तयारी चालविली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महाराष्ट्र दिन काळा दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे तर विदर्भ कनेक्टनेही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रवादीही महाराष्ट्राचा झेंडा घेउन उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. विशेषत: शिवसेना व मनसेतर्फे विदर्भवाद्यांच्या भूमिकेला विरोध केला जातो. यावर्षी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा झेंडा आमनेसामने उभा ठाकण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काळा दिवस : विदर्भ कनेक्टचे आंदोलन शिवसेना, मनसेची भूमिका अस्पष्ट