नागपूर : वाघ, बिबट, अस्वल यासारख्या सर्वच प्राण्यांसाठी जंगल हे त्यांच्या हक्काचे स्थान. परंतु जंगलात फिरायचे सोडून एक बिबट्या चक्क हायवेवर धावत सुटला. बिबट हायवेवर धावतोय पाहून मार्गावरून जाणारे कारचालक त्याचा पाठलाग करू लागले. सुमारे आठ किलोमीटरचा ट्रॅक असलेल्या हायवेवर अखेर हे जनावर थकले आणि थोडावेळ एके ठिकाणी गप्पगार होऊन बसले.
नागपूर-जबलपूर- कन्याकुमारी या ४४ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्ग बुधवारी दुपारी घडलेली ही घटना आहे. हायवे जंगलातून जात असल्यामुळे वन्यजीवांना त्रास होऊ नये यासाठी या मार्गावर अंडरपास बांधण्यात आले आहेत. वाहने जाण्यासाठी असलेल्या उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला उंच असे कठडेही लावण्यात आले आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या आवाजाचा आणि त्यांच्या हॉर्नचा त्रास प्राण्यांना होऊ नये, हा यामागील उद्देश आहे.
बुधवारी दुपारी या हायवेवरील नागपूर-शिवनी मार्गादरम्यान एक बिबट या हायवेवर चढला. मात्र दोन्ही बाजूला उंच कठडे असल्याने त्याला उतरता आले. नाही त्यामुळे तो पळत सुटला. चक्क हायवेवर बिबट धावत आहे हे पाहून या मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी कारने त्याचा पाठलाग केला. सुमारे ८ किलोमीटर लांबीच्या हा मार्ग पार करताना हा बिबट्या थकला. हतबल होऊन मार्गात बसलाही. या हायवे वरून काही नागरिक दुचाकीने व सायकलवरून देखील प्रवास करत होते. या बिबट्याने या दुचाकीस्वार नागरिकांचा देखील पाठलाग केल्याचे चित्र एका व्हिडिओमध्ये आले आहे.
हायवेवरून धावणारा बिबट पाहून हा दोष कोणाचा असा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रत्यक्षात वन्यजीवांचा अधिवास असलेल्या जंगलातून माणसांनी आपल्या सोयीसाठी हायवे बनवला. त्या हायवेवर प्राणी चढल्यावर रस्त्यात मध्ये उतरण्यासाठी कुठेच जागा नाही. हायवेवर येणाऱ्या प्राण्यांची छेड काढू नये यासाठी लक्ष ठेवणारी कोणतीही यंत्रणा सध्या वन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यादृष्टीने वाहन चालकांना कसलेही मार्गदर्शन केले जात नाही. या पार्श्वभूमीवर आता 'फॉरेस्ट पोलीस' ही संकल्पना पुढे येत आहे. वनविभागाने अशा ठिकाणी आपली सुरक्षा यंत्रणा उभी करावी आणि प्राण्यांचे रक्षण करावे, हा या संकल्पनेमागील हेतू आहे.