संजय लचुरिया -
नागपूर - सर्वांनी मतदान करायला हवं, राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी मतदान करायला हवं. निवडणूक आयोगही म्हणतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. स्वर्गीय भाऊजी दफ्तर उच्च प्राथमिक शाळेच्या संघ बिल्डिंगमागील मतदान केंद्रात भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भागवत हे सकाळी लवकरच मतदान केंद्रावर पोहोचले होते.
संरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वप्रथम मतदान केले आहे. त्यासाठी सकाळी-सकाळीच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला हक्कही त्यांनीच बजावला. मतदानासाठी पहिला माझा नंबर हेच त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे, मतदान केल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना प्रत्येकाने मतदान करायला हवं, मतदान कराच असा संदेशही भागवत यांनी देशातील नागरिकांना दिला आहे. राष्ट्राची सुरक्षा आणि एकात्मतेसाठी सर्वांनी मतदान करायलाच हवं. निवडणूक आयोगही सांगतं, आम्हीही तेच म्हणत असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात आज विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतदानासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.