नागपूर - देशभरात प्रभू श्री राम यांच्या अयोध्येतील भव्य दिव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अयोध्या नगरीचीच चर्चा आणि उत्सव साजरा केला जातोय. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी भगवान रामाच्या मंदिरात हजारो फुलांनी अप्रतिम सजावट करण्यात आली आहे. दिव्यांच्या रोषणाईने अवघे राम मंदिर उजळून निघाले आहे. तर, गावागावात विविध कार्यक्रमांनी या उत्सवात आपला सहभाग दिसून येतोय. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यावेळी, त्यांनी चक्क गाणं गायलं. त्यावर, तरुणाईने टाळ्या वाजवून त्यांचा प्रतिसाद दिला.
रामजन्मभूमी संकुलात जमिनीवर हजारो फुलांच्या सहाय्याने आकर्षक पुष्परचना करण्यात आल्या आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने ही फुले लवकर कोमेजणार नाहीत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती टवटवीत राहतील असे सूत्रांनी सांगितले. राम मंदिराची वास्तू व सभोवतालचा परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळला आहे. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीच्या दिव्यांचीच रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्या नगरीसह देशभरात राम मंदिर सोहळ्याचा उत्साह असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ११ दिवसांचं अनुष्ठान केलं आहे. विविध राज्यातील भाजपा नेते आणि रामजन्मभूमी आंदोलनाशी निगडीत सर्वच कारसेवकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूरमधील एका कार्यक्रमात, रामजन्मभूमी आंदोलनातील प्रखुख गाणं गायलं.
जागो तो एक बार हिंदू जागो तो... या टायटल साँगचे हे गीत फडणवीसांनी पूर्णपणे गायलं. त्यावेळी, उपस्थित तरुणांनी टाळ्या वाजवून फडणवीसांना दाद दिली. तसेच, जागे थे वीर शिवाजी, जागे थे गुरू गोविंद प्यारे, जागी थी झाँसी की राणी, जागे थे भगतसिंह दिवाने, जागे थे गोसारी भाय.. अशी महापुरुषांची नावे घेत, त्यांची महती सांगणारं हे हिंदू गीत गायलं. त्यानंतर, जय श्रीराम म्हणत फडणवीसांनी सर्वांचा उत्साह वाढवल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
३२ पायऱ्या चढल्यानंतर होणार दर्शन
श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी केवळ मुख्य मंदिर, इतर अनेक बांधकाम होत आहेत. मुख्य मंदिराशिवाय आजूबाजूचा परिसर, तीर्थक्षेत्राचा विकास इत्यादी अनेक गोष्टी अयोध्येत होत आहेत. ७० एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात संग्रहालय, सभागृह, जटायू मूर्ती, यज्ञ मंडप, औषधी वनस्पतींचे उद्यान इत्यादी अनेक गोष्टी भाविकांचे लक्ष वेधून घेतील. मंदिराच्या ३२ पायऱ्या चढल्यानंतर श्रीरामललाचे दर्शन होणार आहे.
‘राम आये है अयोध्या में’ कॉलर ट्युन लोकप्रिय
राम आये है अयोध्या में ही मोबाइल फोनची कॉलर ट्यून खूप लोकप्रिय झाली आहे. या शहरात काही ठिकाणी खांबांवर धनुष्य-बाणाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यावर राम असे लिहिले आहे. भगवान राम व मंदिराची चित्रे असलेले भगवे ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची व राम मंदिराची छायाचित्रे असलेले फलकही संस्थांनी अयोध्येत लावले आहेत.