Video - 'चले जाव' आंदोलन महात्मा फुलेंनी सुरू केलं; अजित पवारांचा नवा 'इतिहास'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:42 AM2018-07-13T11:42:11+5:302018-07-13T12:01:10+5:30
एका भाजप नेत्याच्या विधानाचा संदर्भ देताना अजित पवारांनी चले जावे आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगितले.
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 'चले जाव आंदोलन महात्मा फुलेंनी' सुरू केल्याचे म्हटले आहे. गुरुवारी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा अजित पवारांनी चूक केली. एका भाजप नेत्याच्या विधानाचा संदर्भ देताना चले जावे आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे अजित पवारांनी सांगितले. मात्र, महात्मा फुलेंच्या चले जाव आंदोलनामुळे, असा उल्लेख त्यांनी केला. अजित पवारांनी हा उल्लेख करताच, बाजूलाच असलेल्या हसन मुश्रिफ यांच्या ती चूक लक्षात आल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरुन स्पष्ट होत आहे. तर आपल्या भाषणात नेहमीच शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख करताना नेत्यांकडून कधी-कधी चुकीने अशी गल्लत होते.
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा मोठी चूक झाली. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने चले जाव आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे म्हटले होते. याचा, अर्थ महात्मा गांधींच्या अहिंसकमार्गाने देशाला मिळालेले स्वातंत्र्य या नेत्यांना मान्य नाही, असे अजित पवार यांना म्हणायचे होते. मात्र, महात्मा गांधींऐवजी महात्मा फुलेंच्या चले जाव आंदोलनामुळे ब्रिटीश देशाबाहेर गेले नाहीत, असे पवार यांनी म्हटले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. कारण, अजित पवारांची ही चूक हसन मुश्रिफ यांच्या तात्काळ लक्षात आली होती. दरम्यान, अजित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अजित पवारांना देशाचा इतिहासच माहिती नसल्याची टीकाही नेटीझन्सकडून करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -