नागपूर - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी अनेकदा ट्विटरवरुन लोकांच्या समस्यांची अडचणींची दखल घेतली आहे. कोरोना लॉकडाऊन काळातही त्यांनी ट्विटरवरुन माहिती मिळताच अनेकांच्या समस्या सोडवल्या आहेत. आता, नागपूर महापालिकेतील टाकीचा व्हॉल्व फुटून वाहणाऱ्या, वाया जाणाऱ्या पाण्याची तात्काळ दखल घेतली आहे.
शिवसेना नेत्या शिल्पा बोडखे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन नागपूर महापालिकेच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेन्शन करुन लक्ष देण्याची विनंती केली आहे. ''विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी उत्तर नागपूर राजीव नगर येथील पाण्याचा पाईप लाईन चा व्हॉल्व फुटला आहे. त्यामुळे, लाखो लिटर पाणी वाया जात आहे, महानगरपालिकेत लोक फोन करत असून कोणताच अधिकारी तिथे पोहचला नाही जरा लक्ष द्यावे, अशी विनंतीपूर्वक मागणी शिल्पा बोडखे यांनी ट्विटरवरुन फडणवीस यांच्याकडे केली.
शिल्पा बोडखे यांच्या ट्विटची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही तात्काळ दखल घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी या ट्विटला रिप्लाय देत देवेंद्र फडणवीस आणि नागपूर महापालिकेला याकडे पाहण्याचे सूचवले आहे. त्यामुळे, टाकीतून वाहणारे पाणी, वाया जाणारे पाणी किती तत्परतेनं बंद होईल, याचीच वाट आता शिल्पा बोडखे पाहात असतील. दरम्यान, टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.