नागपूर - मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी सारवासारव करत, माझे विधान गावातील गावगुंड असलेल्या मोदीनामक व्यक्तीबद्दल होते, असे त्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेते यावरुन चांगलेच संतापले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते, त्यावेळी नानांनी वरील विधान केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
काँग्रेसचं चाललंय तरी काय? नाना पटोलेंच्या व्हिडिओवरुन फडणवीसांचा संताप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने जनतेमध्ये शब्द वापरले, निंदाजनक शब्द वापरले. मोदींना मी मारू शकतो, मोदींना मी शिव्या देऊ शकतो, असे म्हणत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच, देशद्रोह करणे, पंतप्रधानांना मारण्याचं प्लॅनिंग करणे, लोकांना उकसवणे, पंतप्रधानांच्या जीवाला धोका होईल असं कर्तव्य करण्याचं काम पटोले यांनी केलंय. त्यामुळे, पोलिसांनी नाना पटोलेंवर देशद्रोहाचा आणि लोकांना उकसविण्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.