नागपूर : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक शोषण केल्याची तक्रार दाखल करणाऱ्या पीडित मुलीने बुधवारी एक व्हिडिओ जारी करीत आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना केली. या व्हिडिओची दखल घेत चाकणकर यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. एवढेच नव्हे तर काही वेळातच पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांना पाठवून पीडितेला धीर दिला.
वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे. बुधवारी पीडितेने चाकणकर यांना मदतीची याचना करणारा व्हिडिओ पाठविला. ‘मी... रूपालीताई चाकणकरांना मदत मागते. माझ्या जीवाला धोका आहे. मॅडम, मला प्लीज येथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते.’ अशी कळकळीची विनंती पीडितेने या व्हिडिओत केली आहे. चाकणकर यांनी लगेच या व्हिडिओची दखल घेतली. भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस हे पीडितेला मारहाण करीत असून त्रास देत आहेत. आपण या प्रकरणी विशेष लक्ष घाला, अशी मागणी चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून केली. सोबतच पक्षाच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांनाही फोन करून पीडितेची मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी पीडितेच्या जीविताला तडस यांच्या गुंडापासून धोका असून त्यांना त्वरित पोलीस संरक्षण देऊन रामदास तडस,त्यांचा मुलगा व कुटुंबातील सदस्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
चित्रा आता का गप्प का?
- पीडितेचा व्हिडिओ चाकणकर यांनी ट्वीट केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
महिला अत्याचाराचा पुळका असणाऱ्या भाजप नेत्या कुठे बिळात लपून बसल्या आहेत, त्या आता गप्प का, असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आले.
खा. तडस यांना फडणवीसांचा समन्वयाचा सल्ला
- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी जो व्हिडिओ ट्विट केला, त्या संदर्भात आपले खा. रामदास तडस यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्या मुलाचे व त्या महिलेचे रजिस्टर मॅरेज झाले आहे. त्यांना मी सल्ला दिला की हा विषय समन्वयाने सोडवला पाहिजे. कायद्याचा कुठे अनादर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.