उमरेड (नागपूर) : अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असताना आरोपीने स्वत:च्या मोबाइलच्या माध्यमातून व्हिडीओ क्लिप केली. लगेच ही बाब मुलीच्या लक्षात आली आणि घृणास्पद कृत्य उजेडात आले. उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपीस अटक करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय, नागपूर यांच्या न्यायालयात या संपूर्ण प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावासाची तसेच २,००० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
महेश मोरेश्वर डंभारे (२५, रा. मंगळवारी पेठ, उमरेड) असे आरोपीचे नाव असून, ३१ नोव्हेंबर २०१७ ला ही घटना घडली. फिर्यादी अल्पवयीन मुलगी बाथरूममध्ये अंघोळ करीत असताना आरोपीने स्वत:चा मोबाइल बाथरूमच्या दरवाजावरील जागेत ठेवला. फिर्यादीचा व्हिडीओ शूट केला. दरम्यान, मुलीला ही बाब लक्षात येताच तिने मोबाइल घेतला. आरोपीने मोबाइल हिसकावून शिवीगाळ करीत तिला मारण्याची धमकी दिली होती.
यावरून उमरेड पोलीस ठाण्यात आरोपी महेश डंभारे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ (क), ५०४, ५०६, सहकलम ११,१२ पोक्सो. अन्वये गुन्हा दाखल केला गेला. तपास अधिकारी म्हणून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आरती उघडे, सरकारी वकील म्हणून श्याम खुळे यांनी काम पाहिले. सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली. खटल्याची संपरीक्षा दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी मौलिक जबाबदारी पार पाडली.
अन्यथा अतिरिक्त कारावास
या गुन्ह्यात एकूण १० साक्षीदार होते. पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदारांना सबळ शास्त्रोक्त पुरावे व साक्षीदारांचे स्वाक्षऱ्यांच्या आधारे न्यायालयात हजर केले. आरोपीस कलम ३५४ (क) भादंवि सहकलम ११,१२ पोक्सो अन्वये २ वर्षे सश्रम कारावाची व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने २००० रुपये दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.