नागपूर : अंबाझरी तलावाच्या काठावर पावसात चिंब होण्याची हौस भागवून घेणा-या शेकडो जणांची एका सशस्त्र दारूड्याने सोमवारी सायंकाळी घाबरगुंडी उडवली. शस्त्र घेऊन तो मागे धावत असल्याने तरुण, तरुणी, महिला, पुरूष अशा सर्वांनीच आरडाओरड करत जीव मुठीत घेऊन पळ काढला. बराच वेळेनंतर हिम्मत दाखवत एकाने त्याच्या हातचे शस्त्र हिसकावले. त्यानंतर पुढे आलेल्या काहींनी त्याला चोप दिला.
गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरले आहे. अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाला आहे. अंबाझरी ओव्हर फ्लो झाला की तेथे काठावर शेकडो जण गर्दी करतात. तरुणाईची संख्या त्यात मोठी असली तरी अनेक जण पत्नी आणि मुलांसह तेथे पोहचून चिंब होण्याचा आनंद घेतात. सोमवारी दिवसभर अंबाझरीच्या काठावर अशीच गर्दी होती. तरुण तरुणी पाण्यात भिजत गंमत जंमत करीत असतानाच अचानक एक दारूडा हातात भला मोठा सत्तूर (कोयता) आणि दुस-या हातात लोखंडी साखळी घेऊन तेथे पोहचला. त्याने गर्दीकडे धाव घेताच अनेकांची घाबरगुंडी उडाली. तरुणी आणि महिलाच नव्हे तर तरुण आणि पुरुष मंडळीही त्या दारुड्याच्या धाकाने जीव वाचविण्यासाठी पळू लागले.
दोन-तीनशे जणांची गर्दी असताना एका दारुड्याला पकडण्याती हिम्मत दोन तीन तरुण दाखवत नव्हते. त्यामुळे निर्ढावलेला दारूडा महिला-मुलींमागे आरडाओरड करीत शस्त्र घेऊन धावत होता. काही वेळेनंतर त्याने पाण्यात असलेला भला मोठा दगड उचलला. बराच वेळेपासून त्याचा हा गोंधळ सुरू होता. शेवटी एका व्यक्तीने हिम्मत करून त्याच्यावर धाव घेतली. त्याचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. केवळ त्याला थापड मारण्याचा धाक दाखवला अन् आतापर्यंत अनेकांना घाबरवून सोडणारा हा दारूडा घाबरला. त्याने आपले शस्त्र टाकले. नंतर त्याच्यावर अनेकांनी धाव घेतली आणि काहींनी त्याला चोप दिला.
पोलिसांची धावपळ, आरोपीला अटक विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात मोठ्या संख्येत जागोजागी पोलीस दिसतात. ज्यावेळी दारूड्याचा हा हैदोस सुरू होता. त्यावेळी काहींनी मोबाईलवर त्याचा व्हिडीओ बनविला. मात्र, कोणत्याही सजग नागरिकाने १०० नंबरवर किंवा अंबाझरी ठाण्यात फोन करून पोलिसांना कळविण्याची तसदी घेतली नाही. मंगळवारी सकाळी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली. अंबाझरीचे ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी लगेच मंगळवारी अंबाझरी तलावावर पोलिसांचा बंदोबस्त लावला. व्हिडीओच्या मदतीने त्या दारूड्याची माहिती पोलिसांनी काढली. त्याचे नाव विकास मारके असून, मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास पोलीस त्याच्या घरी पोहचण्यापूर्वीच तो पळून गेला. त्याचे वर्तन मनोरुग्णासारखे असल्याची माहिती आजुबाजुच्यांनी पोलिसांना दिली.