लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ निवडणुकीचे मतदान अखेर शुक्रवारी पार पडले. तब्बल १२ वर्षांनंतर या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान झाले. दिवसभरातील मतदानाची टक्केवारी ९८.९३ टक्के इतकी होती. एका मतदाराला निवडणूक आयोगाने अपात्र ठरविले होते. ५ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.
या निवडणुकीसाठी भाजपतर्फे चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसतर्फे रवींद्र भोयर व अपक्ष मंगेश देशमुख अशी तिरंगी लढत होती. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने भोयर यांच्या ऐवजी देशमुख यांना पाठिंबा दिल्याने राजकीय ‘ट्विस्ट’ निर्माण झाले. महाविकास आघाडी व भाजप दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
सकाळी आठ वाजता जिल्ह्यातील सर्व १५ मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. बसपाने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदार केंद्रावर बसपाचे काही नगरसेवक सकाळीच मतदानासाठी आले. त्यानंतर काँग्रेसच्या मतदारांनीदेखील हजेरी लावली. सकाळी १० वाजेपर्यंत अवघे २.५ टक्के मतदानच झाले होते. मात्र, त्यानंतर गती वाढली.
सकाळी साडेअकराच्या सुमारास भाजपचे मतदार थेट पेंचवरून बसने टप्प्याटप्प्याने मतदान केंद्रावर पोहोचले. कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी मागील काही दिवसांपासून भाजपने जिल्ह्यातील सर्व मतदार नागपुरातून दूरच ठेवले होते. दुपारी १२ वाजता एकूण मतदानाचा आकडा २५ टक्क्यांवर गेला तर दोन वाजता हीच टक्केवारी ८९.१० टक्के इतकी झाली. अखेरच्या क्षणापर्यंत ५६० मतदारांपैकी ५५४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर निवळला तणाव
निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यापासूनच काँग्रेस व भाजपमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र, मतदान करून बाहेर आल्यानंतर काँग्रेस व भाजपच्या मतदारांमधील तणाव निवळल्याचे दिसून आले. भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह विविध नगरसेवकांमध्ये बराच वेळ दिलखुलासपणे संवाद झाल्याचे दिसून आले.
‘मास्क’शिवाय प्रवेश कसा?
या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. मास्क अनिवार्य असतानादेखील अनेक मतदार विनामास्कच मतदान केंद्र परिसरात दाखल झाले. यात भाजप, काँग्रेससह विविध पक्षांच्या नगरसेवकांचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीदेखील कुणालाही टोकले नाही.
असे झाले मतदान
वेळ - मतदानाची टक्केवारी
सकाळी १० वाजता - २.५ टक्के
दुपारी १२ वाजता - २५ टक्के
दुपारी २ वाजता - ८९.१० टक्के
दुपारी ४ वाजता - ९८.९३ टक्के