नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा न करता नागपूर शहर काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. २० ते ३० मे दरम्यान सहाही मतदारसंघात बूथ अध्यक्षांपासून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘विधानसभा संकल्प बैठक’ आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्यासह प्रत्येक बूथवर २५ ते ५० मते कशी वाढविता येतील यासाठी रणणिती आखून जबाबदारी सोपविली जाणार आहे. २०१९ च्या लोकससभेत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार मतांनी विजयी झाले होते. गडकरी फक्त उत्तर नागपुरात मागे होते. उर्वरित पाच मतदारसंघात त्यांना मोठे मताधिक्य होते.
मात्र, त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चित्र बरेचसे पालटले होते. लोकसभेतील बराचसा फरक विधानसभेत भरून निघाला. उत्तर नागपूर व पश्चिम नागपूर हे मतदारसंघ काँग्रेसने जिंकले. तर मध्य नागपूर व दक्षिण नागपूर हे दोन मतदारसंघ सुमारे ४ हजार मतांच्या फरकाने गमावले. हे चित्र डोळ्यासमोर ठेवून लोकसभेच्या निकालाची वाट न पाहता शहर काँग्रेस विधानसभेची तयारी करणार आहे. या बैठकीत आपण लोकसभेत कुठे कमी पडलो, काय सुधारणा करता येईल यावर मंथन होईल. महापालिकेशी संबंधित स्थानिक प्रश्नांवर चर्चा होईल. या बैठकीत लोकसभेच्या निकालानंतर बूथ अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना नेमके काय करायचे आहे, याचे दिशानिर्देश देत कार्यक्रम आखून दिली जाणार आहे.
अशी करणार विधानसभेची तयारी
- लोकसभेच्या निकालानंतर शहर काँग्रेसतर्फे या सर्व बूथचा आढावा घेतला जाईल. मिळालेल्या मतांच्या आधारे बूथची ए,बी व सी अशी वर्गवारी केली जाईल.
- त्यानंतर विधानसभा निहाय संघटनात्मक बैठका घेऊन बी व सी वर्गवारीतील बूथवर लक्ष केंद्रीय केले जाईल. या बूथवर किती मतदान झाले, काँग्रेसच्या विचाराचे मतदान या बूथवर कसे वाढविता येईल, याचे नियोजन केले जाईल.
- ए वर्गवारीतील बूथवर आणखी १० टक्क्यांची आघाडी कशी घेता येईल, यासाठी वैयक्तिक संपर्कावर भर देऊन काम केले जाईल.
- लोकसभेत मतदानासाठी न आलेल्या मतदारांशी कसा संपर्क करता येईल तसेच मतदार यादीतील त्रुटी कशा दूर करता येतील,याचे नियोजन केले जाईल.
- सामान्य जनतेचे प्रश्न सुटले का, याची प्रत्येक प्रभागात चाचपणी केली जाईल. २४ बाय ७ पाणी मिळत आहे का, दररोज कचरा उचलला जातो का, पथदिवे सुरू आहेत का, या प्रश्नांवर जनतेला जागरूक करण्यासाठी शहरभर मोहीम राबविली जाईल.
- लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ता स्वयंस्फूर्तपणे बाहेर पडला. लोकसभेत नागपूरकर मतदारांनी दिलेली साथ पाहून काँग्रेस कार्यकर्ते उत्साहात आहेत. लोकसभेच्या निकालापूर्वीच शहरातील सहाही मतदारसंघात विधानसभा संकल्प बैठक घेऊन आम्ही विधानसभेची तयारी सुरू करीत आहोत. विधानसभेत सत्ता परिवर्तन घडविल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते आता स्वस्थ बसणार नाहीत.- आ. विकास ठाकरे, शहर अध्यक्ष काँग्रेस