लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु कामठी, काटोल व रामटेक या जागेवरुन कोण लढणार हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याच कामठी मतदारसंघातून लढणार की काटोलमधून त्यांना पक्ष उभा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.भाजपच्या बहुप्रतिक्षित यादीची मंगळवारी दुपारी घोषणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार सुधाकर देशमुख (नागपूर-पश्चिम), कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), विकास कुंभारे (नागपूर-मध्य), डॉ.मिलींद माने (नागपूर-उत्तर) यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर-दक्षिणचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागेवर माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.नागपूर जिल्ह्यातील सहापैकी तीनच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीचे आमदार आहेत. परंतु तेथील उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे बावनकुळे यांना कामठी मिळणार की ते काटोलमधून लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हिंगण्यातून विद्यमान आमदार समीर मेघे, उमरेडहून सुधीर पारवे यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. तर सावनेर मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांना तिकीट मिळाले आहे.चर्चांना पूर्णविरामलोकसभा निवडणूकांनंतर काही मतदारसंघात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या यादीमुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. नागपूर-दक्षिणची जागा वगळता शहरातील सर्वच जागांवरील विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम आहे.