VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 08:02 AM2019-09-16T08:02:19+5:302019-09-16T08:03:15+5:30
शिवसेनेच्या मुलाखतींनी वाढविला भाजप इच्छुकांचा बीपी
जितेंद्र ढवळे
नागपूर : विदर्भाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक मतदार संघावर भाजप आणि शिवसेनेने दावा केला आहे. युतीत या दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला येणार असल्याने येथील इच्छुक उमेदवारांना कामाला लागण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले. मात्र शनिवारी पारंपारिक युतीत शिवसेनेकडे असलेल्या काटोल आणि रामटेक मतदारसंघासह जिल्ह्यातील बाराही मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेच्या वतीने मुंबईत घेण्यात आल्या. त्यामुळे युतीत जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या जागा शिवसेनेला जाणार आहेत, अशी विचारणा स्थानिक भाजप नेत्यांकडून केली जात आहे.
१५ दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे प्रदेश महामंत्री आ.अतुल भातखळकर यांनी काटोल आणि रामटेकची जागा भाजपच लढणार असल्याचे सांगत स्थानिक नेत्यांना आश्वस्त केले होते. २०१४ मध्ये ज्या मतदार संघातून भाजपचे उमेदवार निवडूण आले त्या जागा शिवसेनेला सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. २०१४ मध्ये काटोलमध्ये भाजपचे आशिष देशमुख तर रामटेकमध्ये डी.मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले होते.
काटोलमध्ये आशिष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने या जागेवर आता शिवसेनेने दावा केला आहे तर रामटेक सेनेचा पारंपारिक मतदार संघ असल्याने युतीत ही जागा भाजपला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका सेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे युती झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काटोल आणि रामटेकच्या जागेबाबत काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणूक निकाल (२०१४)
काटोल मतदारसंघ
आशिष देशमुख - भाजपा (७०,३४४)
अनिल देशमुख -राष्ट्रवादी काँग्रेस (६४,७८७)
राजेंद्र हरणे - शिवसेना (१३,६४९)
राहुल देशमुख- शेकाप (९,५८९)
रामटेक मतदारसंघ
डी.मल्लिकार्जुन रेड्डी - भाजपा (५९,३४३)
आशिष जयस्वाल - शिवसेना (४७,२६२)
सुबोध मोहिते - काँग्रेस (३५,५४६)
अमोल देशमुख - राष्ट्रवादी (९,१६२)