आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाºया वाङ्मय पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. विदर्भातील मान्यवर सारस्वतांच्या स्मरणार्थ दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जात असून येत्या १४ जानेवारी २०१८ रोजी वि.सा. संघाच्या ९५ व्या वर्धापनदिननिमित्त आयोजित समारंभात पुरस्करांचे मानकरी ठरलेल्यांना ते प्रदान करण्यात येतील.पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांमध्ये ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक डॉ. मधुकर आपटे यांना त्यांच्या ‘खगोलशास्त्राचे अंतरंग’ या ग्रंथासाठी डॉ. य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार, रवींद्र जवादे यांना त्यांच्या ‘दिवेलागण’ या लेखसंग्रहासाठी गो. रा. दोडके स्मृती ललित लेखन पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शरदचंद्र मुक्तिबोध स्मृती कवितालेखन पुरस्कार ‘रानोमाळ’ या काव्यसंग्रहासाठी मो. ज. मुठाळ यांना प्रदान करण्यात येईल. डॉ. मा.गो. देशमुख स्मृती संत साहित्य लेखनाचा पुरस्कार संजय बर्वे यांना त्यांच्या ‘आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर’ या ग्रंथाला प्राप्त झाला आहे. कुसुमानिल स्मृती समीक्षालेखन पुरस्कारासाठी डॉ. पराग घोंगे यांना ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र : एक रसास्वाद’ या ग्रंथासाठी देण्यात येईल. डॉ. मधुकर नंदनवार यांना ‘भंडारा जिल्ह्यातील लोकनाट्य दंडार’ या ग्रंथासाठी आणि नारायणराव सपाटे यांना त्यांच्या ‘काळोख गडद होत चाललाय’ या काव्यसंग्रहासाठी नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.