नागपूर : विज्ञानाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद यंदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले आहे. मंगळवारपासून सुरू होणारी ही परिषद पाच दिवस चालणार असून यात रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील. त्यामुळे ३ ते ७ जानेवारी दरम्यान नागपुरात एकप्रकारे विज्ञानाचा उत्सव राहणार असून नागपूरचे वातावरण ‘विज्ञान परमो धर्म’ असे असेल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरातील मुख्य पेंडालमध्ये उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन या परिषदेचे उद्घाटन होईल. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी राहतील.
- नागपुरात पाचव्यांदा आयोजन
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला तब्बल ४८ वर्षांनंतर इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. याआधी १९७४ साली ६१ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद नागपूर विद्यापीठाने भूषविले होते. ही परिषद १९१४ साली सुरू झाली. त्यानंतर १९२० साली सातवी, १९३१ साली अठरावी, तसेच १९४५ साली ३२ वी सायन्स काँग्रेस नागपूरमध्ये पार पडली. २०२३ मध्ये १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. आता या आयोजनाचे स्वरूप अतिभव्य झाले असून १०८ व्या काँग्रेसमध्ये शंभरावर मुख्य व्याख्याने व चारशेवर इतर व्याख्याने होतील. शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण, अशी या आयोजनाची थीम आहे.