नागपूर : श्री दिगंबर जैन महावीर महासभेतर्फे तयार करण्यात आलेल्या विहार मोबाईल अॅपचा शुभारंभ राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकताच झाला. जैन साधूंच्या व्यवस्थेच्या दृष्टीने हा अॅप बनविण्यात आला आहे.
जैन साधू संपूर्ण देशात पायी विहार करीत असतात. कोणत्याही वाहनाचा वापर ते करीत नाहीत. दररोज १५ ते २० किमी पायी त्यांचा प्रवास असतो. या दरम्यान जेथे जागा उपलब्ध असेल तेथेच ते थांबतात. साधूंचे अत्यंत कडक नियम असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ते थांबत नाहीत. यासाठी एका चमूला पुढच्या स्थानावर पाठवून साधूंसाठी तेथील व्यवस्था करावी लागते. या सर्व अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा अॅप तयार करण्यात आला आहे.
या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशात जैन साधूंसाठी उचित ५००० स्थानांची एकत्रित माहिती या अॅपमध्ये आहे. याशिवाय हॉस्पिटल, आयुर्वेदिक डॉक्टर्स आदींची माहितीही या अॅपमधून मिळेल. तसेच जैन साधूंचे ह्यलाईव्ह लोकेशनह्णही या अॅपद्वारे पाहता येणार आहे. त्यांना आवश्यक असलेली मदतही त्वरित पोहोचवता येईल. यामुळे जैन साधूंना आपल्या प्रवासाचे दीर्घकालीन नियोजन करणे सोपे होणार आहे.