विजय डांगरे गुंतवणुकदारांना पैसे परत करणार : हायकोर्टात ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:15 PM2019-06-04T22:15:34+5:302019-06-04T22:16:14+5:30
महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची व इच्छुकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराजा डेव्हलपर्सचे संचालक विजय डांगरे यांनी पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची व इच्छुकांना त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.
गत १० जानेवारी रोजी सक्करदरा पोलिसांनी नवीन शुक्रवारी येथील पीडित गुंतवणूकदार रामूजी बाबुराव वानखेडे (६६) यांच्या तक्रारीवरून डांगरे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ५०४ व ५०६-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. त्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी डांगरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयात दोन कोटी रुपये जमा केल्यामुळे त्यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे. हे प्रकरण सोमवारी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता डांगरे यांनी स्वत:च पुढाकार घेऊन न्यायालयाला वरीलप्रमाणे ग्वाही दिली. त्यानंतर न्यायालयाने डांगरे व गुंतवणूकदार यांच्यातील वादावर आवश्यक निर्णय देण्यासाठी अॅड. श्रीधर पुरोहित यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आणि डांगरे व गुंतवणूकदारांना येत्या ६ जून रोजी दुपारी २.३० वाजता अॅड. पुरोहित यांच्यासमक्ष उपस्थित होण्यास सांगितले. तसेच,याचा अहवाल चार आठवड्यात सादर करण्यात यावा असा आदेश पुरोहित यांना दिला.
अशी आहे पोलीस तक्रार
पोलीस तक्रारीतील माहितीनुसार, डांगरे यांनी सरकारी जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगून ती तक्रारकर्ते वानखेडे यांच्यासह अनेकांना विकली. जमीन सरकारी असल्याची माहिती झाल्यानंतर वानखेडे यांनी डांगरे यांना पैसे परत मागितले होते. परंतु, डांगरे यांनी त्यांना सहकार्य केले नाही. उलट, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी डांगरे यांनी सुरुवातीला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.