नागपूर- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या 'प्रणव : माय फादर' या पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात; पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले, 'प्रणव मुखर्जी हे ज्येष्ठ नेते होते आणि काँग्रेसने त्यांच्या क्षमतेला न्याय दिला. आता शर्मिष्ठाजी असे का बोलत आहेत? भाजप नेहमीच तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या लोकांना बदनाम करण्याचा छुपा अजेंडा राबवत असते, असा आरोपही त्यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींचे कौतुक करताना भाजपवर आरोप केले. ते म्हणाले, 'राहुल हे अतिशय प्रामाणिक नेते आहेत. भाजप राहुल गांधींना नेहमीच घाबरते. रणनीतीनुसार भाजप शर्मिष्ठा मुखर्जी यांच्या माध्यमातून राहुल गांधींना बदनाम करत आहे, असंही वड्डेटीवार म्हणाले.
शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलं आहे की, माजी कॅबिनेट मंत्री आणि पक्षाचे संपर्क विभाग प्रमुख अजय माकन यांनी २७ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी सहभागी झाले होते आणि त्यांनी प्रस्तावित सरकारी अध्यादेशाला पूर्ण बकवास म्हटले होते. त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसून त्यांनी अध्यादेशाची प्रत फाडली. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असेही नमूद केले आहे की, त्यांच्या वडिलांनी त्यांना असेही सांगितले होते की कदाचित राहुल गांधींसाठी राजकारण नाही आणि त्यांची राजकीय समज कमी आहे.