नागपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. गुरुवारी मुख्यमंत्र्यांना फोन करीत आपण मराठा समाजाच्या आंदोलनाला भेट दिली, मग ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का करता, त्यांची बैठक का घेत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत ओबीसी संघटनांसोबत लवकरात लवकर बैठक लावण्याची विनंती केली.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरसह राज्यभर आंदोलन सुरू आहे. चंद्रपुरात रवींद्र टोंगे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या आंदोलनाला मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: भेट देतील, ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधीला चर्चेसाठी मुंबईला बोलावतील, याची ओबीसी बांधव वाट पाहत आहेत. त्यांना बोलावून त्यांचे प्रश्न जाणून घ्यायला हवे. मात्र, सरकारकडून सकारात्मक हालचाली होताना दिसत नाही, अशी नाराजी आपण मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलताना व्यक्त केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
५२ टक्के ओबीसी समाज आहे. एवढ्या मोठ्या समाजाला सरकार गांभीर्याने घेत नाही, ही चांगली बाब नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी गणपती विसर्जनानंतर २९ सप्टेंबरच्या आसपास ओबीसी संघटनांसोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.