उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले
By कमलेश वानखेडे | Published: May 2, 2024 06:19 PM2024-05-02T18:19:29+5:302024-05-02T18:22:58+5:30
विजय वडेट्टीवार यांचा आरोप : भाजपने देशद्रोह्याला तिकीट दिले
नागपूर : उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. कसाबला कोणी बिर्याणी देईल का आणि नंतर उज्वल निकम यांनी ते मान्य केले. जे न्यायालयात पुरावे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत, हे कसले वकील, हे देशद्रोही आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. ती आरएसएसच्या समर्पित एका पोलिस अधिकाऱ्याची होती. त्यावेळी हे सत्य कोर्टापासून लपवल्या गेले. अशा देशद्रोह्याला जर भाजप तिकीट देत असेल तर भाजप अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार का ,असा सवाल त्यांनी केला. भाजप शिंदे गटाने भ्रष्टाचार करणाऱ्याला किती मानाचे स्थान दिले आहे. ज्यांच्यावर किरीट सोमय्यानी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व आता भाजपचे उमेदवार आहेत. यावरूनच आता भाजप हा बेईमानांचा, चोरांचा पक्ष झालाय हे नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
कर्नाटकमध्ये ज्याच्यावर बलात्काराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा बलात्काऱ्याला भाजप तिकीट देत असेल तर महिलांप्रती त्यांचे विचार कसे आहेत हे दिसून येते. ब्रूजभूषण सिंग, कुलभूषण सिंगर, पद्मराजन, कन्हैयालाल मिश्रा, चिन्मयानंद हे सर्व महिलांचे शोषण करणारे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरताहेत. भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. जनता आता हे ओळखून आहे. म्हणून तिसऱ्या चौथा टप्प्यात लोक यांना गाडण्याची वाट बघत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाणार नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुड्या सोडतात, अनेकदा त्या पुड्या मध्ये काही निघत नाही, असा चिमटाही त्यांनी आंबेडकरांना काढला.
सलमान खान प्रकरणातील आरोपी आत्महत्या की खून ?
- सलमान खान प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. पण कदाचित त्याचा खून झाला असावा असा संशय आहे. कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो. एवढा मोठा हायप्रोफाईल विषय असताना या प्रकरणाला काही कलाटणी देण्याचा उद्देश आहे का, याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पोलीस ठाण्यात आत्महत्या किंवा मृत्यू झाला. नितिमत्तेच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.