नागपूर : चंद्रपूरच्या उमेदवारीसाठी आ. प्रतिभा धानोरकर यांचे समर्थन करताना कुणबी समाजाच्या काही पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहेत. यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशा पोस्टवर वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. मी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही. तिकीट कुणाला द्यायये याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे. आजवर मी अनेकांचे नाव सुचवले आहे. यावेळी मी मुलीसाठी तिकीट मागितली त्यात दोष काय, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसमध्ये जात-पात कधी पाहिली जात नाही. राजकारण करताना अशयापद्धतीने आमच्या विचारधारेने काही स्वार्थी मतलबी लोक विषारी विचार पेरत असतात. गेले ३० ते ३५ वर्षांत मी राजकारणात सक्रिय आहे. मी कधी जातीय द्वेष केलेला नाही. ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत, ते स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू आहे.
पाच दहा लोकांचे टोळके आहे. ते हे धंदे करत असतात. बाळू धानोरकर यांना मी कसे तिकीट मिळवून दिले हे सगळ्या लोकांना माहित आहे. आ. सुधाकर अडबाले यांच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेतला व त्यांचे कटलेले तिकीट मिळवून दिले. समाजातील अनेक नेत्यांचे, मान्यवरांचे मला फोन येत असून ते धीर देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आशीष देशमुख आज असांस्कृतिक शब्द वापरत आहेत. तेच देशमुख २०१९ मध्ये कुणाची तिकीट मागण्यासाठी आले होते, याचे उत्तर त्यांनी दिले तर योग्य होईल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.