नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. देशात वादग्रस्त ठरलेल्या तीन कृषी कायद्यांना वापस घेण्यात येणार असल्याचे मोदींनी देशवासीयांना सांगितले. तसेच, आंदोलक शेतकऱ्यांनी घरी जावे, गुरु नानक जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या कुटुंबीयांसोबत असावे, असेही मोदींनी म्हटले. मोदींच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा बळी गेला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पंतप्रधान मोदींना माफी मागावी, अशी मागणी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हा विजय आहे. परंतु, कायदे रद्द करायचे होतेच तर मग ९ महिने वाट का पाहिली? पूर्वीच कृषी कायदे रद्द केले असते तर शेतकऱ्यांचा विरोध झाला नसता. परंतु, इतकी महिने शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं, यात ६०० शेतकऱ्यांचा बळी गेला त्याला जबाबदार कोण? उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुकांना सामोर ठेऊन तर हे कायदे रद्द करण्यात नाही आले ना, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
इतकी महिने शेतकरी थंडी, ऊन, पावसात आंदोलन करत होता, एकेका शेतकऱ्याचा जीव जात होता. त्यावेळी हे कायदे रद्द करण्याचं का सुचलं नाही. आता शेतकऱ्यांच आंदोलन पेटलं आहे, त्यात समोर उत्तर प्रदेश, पंजाबमधील निवडणुका आहेत आणि अशा परिस्थितीत सत्ता जाऊ नये, केवळ हाच उद्देश हे कायदे मागे घेण्यामागे दिसतो आहे. कारण, निवडणुका तोंडावर आल्या की दरवाढ, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायचे, काही निर्णय घ्यायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा वाढवायचे, हेच हे सरकार करत आलं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी काँग्रेसनेही आंदोलन केलं होतं. काँग्रेसने समर्थन केलं. रस्त्यावर उतरली. आमच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आम्ही या कायद्याला विरोध केला. यावेळी भाजपकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या अंगावर गाडी टाकली. आंदोलन चिरडण्याचे हे धंदे होते. पण शेतकरी ठाम राहिला. शेतकऱ्यांच्या संघर्षाचं यश आणि निवडणुकीत बसलेल्या चपराकीचा हा विजय आहे. यूपीत हादरा बसेल, दिल्लीतील सरकार जाईल म्हणूनच सरकारला झुकावं लागलं, असंही त्यांनी सांगितलं.