नागपूर, रामटेक लोकसभेसाठी वडेट्टीवार ‘ॲक्शन मोडवर’; ११ ऑगस्ट रोजी रविभवनात बैठक
By कमलेश वानखेडे | Published: August 8, 2023 04:40 PM2023-08-08T16:40:03+5:302023-08-08T16:41:26+5:30
एकूणच स्थितीचा आढावा घेणार
नागपूर : विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूर व रामटेक लोकसभेचे निरीक्षक म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली. आता या दोन्ही मतदारसंघात निकाल देण्यासाठी वडेट्टीवार सक्रीय झाले आहेत. ११ ऑगस्ट रोजी या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक रविभवनात बोलाविण्यात आली असून तीत रणणिती आखली जाणार आहे.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नागपूर लोकसभेची तर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत रामटेक लोकसभेची बैठक होईल. या बैठकीसाठी मतदारसंघातील आमदार, शहर व जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री, माजी आमदार, तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, विविध सेल व आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या दोन्ही मतदारसंघात काय स्थिती आहे, याचा काँग्रेसला किती फायदा-नुकसान होईल, भाजपची स्थिती कशी आहे, काँग्रेससमोरील आव्हाने व अडचणी काय आहेत, काँग्रेसने मतदारांना गळ घालण्यासाठी नेमके काय करायला हवे आदी बाबींवर उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
सध्या उमेदवारीवर चर्चा नाही
प्राप्त माहितीनुसार या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावांवर कुठलिही चर्चा होणार नाही. कुणीही बैठकीत उमेदवारांची नावे सूचवू नये, शिफारशी करू नये, अशा सूचना सुरुवातीलाच दिल्या जातील. पक्षाची वर्तमान स्थिती व भविष्यातील तयारी यावरर्भर दिला जाणार आहे.
‘फॉर्म’मध्ये माहिती भरून घेणार
दोन्ही लोकसबा मतदारसंघात पक्ष बांधणीची स्थिती काय आहे, किती बूथची बांधणी झाली आहे, याचा आढावा घेतल्यानंतर ती माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे हा फॉर्म वडेट्टीवार यांनी स्वत: तयार केला आहे.