संघ प्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथाच्या लोकांना जोडणारी - विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 01:38 PM2022-06-03T13:38:10+5:302022-06-03T14:14:08+5:30
ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
नागपूर : सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो असे, वडेट्टीवार म्हणाले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
संघ प्रमुखांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथ आणि लोकांना जोडणारी आहे. परंतू, ही भूमिका त्यांनी कायम ठेवली पाहिजे, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहिली आहे. त्यानुसार आम्ही धर्माचे पालन करतो आणि संविधानानुसार राज्य कारभार पाहतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
सरसंघचालक म्हणाले...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या गुरुवारी समारोपप्रसंगी सरसंघचालक म्हणाले, देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना वाटते की, आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत.
सद्य:स्थितीत देशात ज्ञानवापीच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. ही घटना इतिहासात घडली होती. आता हिंदू व मुस्लीम पक्षांनी अतिवादीपणा टाळला पाहिजे. मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, तर हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता, या शब्दात मोहन भागवत यांनी दोन्ही समाजांचे कान टोचले.
हिंदू-मुस्लिमांनी अतिवादी लोकांना टोकावे
देशाला विश्वगुरू बनविण्याचा मार्ग एकता व समन्वयातून जातो. जे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाही, त्यांनी येथील परंपरेशी व संस्कृतीशी समरस व्हायला हवे. त्यांनी विखार निर्माण करायला नको. एकमेकांना धमक्या देणे दोन्ही धर्माच्या लोकांनी टाळले पाहिजे. दोन्ही धर्मातील लोकांनी आपल्यातील अतिवादी लोकांना टोकायला हवे, असे सरसंघचालकांनी सांगितले.