नागपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. हा संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे संप आणखी चिघळत चालला आहे. आणि त्यामुळेच राज्यावर ही परिस्थिती ओढावली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. याबाबत आंदोलनकर्त्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची आमची तयारी असल्याचेही ते म्हणाले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची ओरड सुरू आहे. ते सत्तेत असताना विलिनीकरण होत नाही असं सांगत होते. मात्र, आता तेच एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवरून राजकारण करत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.