लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक विजयादशमी सोहळ््यासाठी स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालअधिकारांसाठी कार्यरत असणारे व नोबेल पुरस्कारविजेते कैलास सत्यार्थी हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. महागाई, इंधन दरवाढ, राममंदिर, ‘मी टू’ इत्यादी मुद्द्यांवरुन राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भुमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाचा विजयादशमी सोहळा ‘हायटेक’ करण्याचा संघाचे प्रयत्न आहेत.पुढील वर्षी लोकसभा निवडणूका आहेत. त्याचप्रमाणे पुढील महिन्यातच मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात निवडणूका आहेत. मागील चार वर्षांपैकी यंदा जनतेमधून केंद्र शासनाविरोधात नाराजीचा सूर जास्त प्रमाणात उमटत आहेत. अशा स्थितीत केंद्राचे आर्थिक धोरण, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, कृषी व ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ.भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.संघाच्या शस्त्रपूजनाबाबत विविध कयास वर्तविण्यात येत होते. मात्र शस्त्रपूजन ही भारतीय परंपरा आहे व यंदादेखील शस्त्रपूजन होईलच, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.‘ ट्विटर ’, ‘फेसबुक’वर ‘लाईव्ह’देशात सत्ताबदल झाल्यानंतरचा हा पाचवा विजयादशमी उत्सव असला तरी शाखांची वाढलेली संख्या, संघाचा वाढता दबदबा यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सोहळ्याचे संघाच्या संकेतस्थळावरुन ‘वेबकास्टिंग’ करण्यात येणार आहे. सोबतच प्रथमच ‘फेसबुक’सह, ट्विटर, युट्यूब या माध्यमातूनदेखील संघाचा कार्यक्रम जगभरात ‘लाईव्ह’ होणार आहे.