लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील रेशीमबाग मैदानावर साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात कोरोनामुळे यंदा अनेक बदल अपेक्षित आहेत. कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करतच संघातर्फे विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात येईल. २५ ऑक्टोबरपर्यंत सरकार व स्थानिक प्रशासनातर्फे आणखी काय नव्या सूचना येतात, याची संघाकडून प्रतीक्षा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एप्रिल ते जून महिन्यादरम्यान होणारे जवळपास ९० पेक्षा जास्त संघशिक्षा वर्ग आणि इतर सार्वजनिक आणि सामूहिक कार्यक्रम रद्द केले होते. यात बंगळूरू येथे आयोजित अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचादेखील समावेश होता. आता विजयादशमी सोहळ्याचे आयोजन कसे होणार याबाबत स्वयंसेवकांकडूनदेखील विचारणा होत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात संघाचे स्वयंसेवक पथसंचलन, योग व इतर प्रात्यक्षिके सादर करतात. तसेच या कार्यक्रमाला देशातील गणमान्य अतिथींचे भाषण आणि सरसंघचालकांचे मार्गदर्शन होते.
सरसंघचालक काय सांगतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून असते. परंतु, यंदा कार्यक्रमात बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीतील नियमावलीनुसार जर कार्यक्रम झाला तर शंभराच्या आतच लोक उपस्थित राहतील व सरसंघचालक भाषण करतील. शिवाय फेसमास्क, शारीरिक अंतर, सॅनिटाझरचा वापर आणि कोरोनासंदर्भातील इतर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून यंदाचा विजयादशमी कार्यक्रम आयोजित होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.ऑनलाईन होणार प्रक्षेपणकार्यक्रमाचे स्वरूप निश्चित नसले तर सरसंघचालकांचे भाषण व स्वयंसेवकांच्या कवायतींचे जगभरात ऑनलाईन प्रक्षेपण करण्याची संघाची तयारी आहे. मागील चार वर्षांपासून दरवर्षी वेबकास्टिंग होतच आहे.